साेलापूरमध्ये लढत तरुणाईची; प्रणिती शिंदे बाजी मारणार की, भाजप तिसऱ्यांदा जागा राखणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 08:40 AM2024-04-26T08:40:08+5:302024-04-26T08:40:56+5:30
संघटनात्मक रचनेमुळे भाजपला विजयाचा विश्वास आहे, तर भाजपचे दाेन खासदार निष्क्रिय ठरले या मुद्द्यावर काँग्रेसला विजयाची आशा वाटत आहे.
राकेश कदम
साेलापूर : साेलापूर लाेकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे आमदार राम सातपुते या दाेन युवा आमदारांमध्ये थेट लढत आहे. मागील दाेन निवडणुकीत भाजपने काँग्रेसचा पराभव केला आहे. प्रणिती शिंदे बाजी मारणार की भाजप तिसऱ्यांदा जागा राखणार? याकडे लक्ष आहे.
साेलापूर लाेकसभेत चार भाजप, एक काँग्रेस आणि एक अजित पवार गटाचे आमदार आहेत. प्रणिती शिंदे या शहर मध्यच्या आमदार आहेत; तर सातपुते हे माळशिरसचे आमदार आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात ‘साेलापूर अन् परका’ असा मुद्दा आणला. तर, दुसऱ्या टप्प्यात काँग्रेसने ४० वर्षांत काय केले, भाजपचे दाेन खासदार कसे निष्क्रिय ठरले, या मुद्द्यांवर भाषणे सुरू आहेत. संघटनात्मक रचनेमुळे भाजपला विजयाचा विश्वास आहे, तर भाजपचे दाेन खासदार निष्क्रिय ठरले या मुद्द्यावर काँग्रेसला विजयाची आशा वाटत आहे.
गटातटाचा काय हाेणार परिणाम ?
काँग्रेसचे सर्व गट सध्या एकत्र आहेत. शरद पवार गट, उद्धवसेनेचा गटही त्यांच्यासाेबत आला आहे. भाजपकडून दहापेक्षा अधिक लाेक इच्छुक हाेते. माेहाेळमधील क्षीरसागर कुटुंंबातील एक गट भाजपपासून दुरावला आहे. पंढरपूर, मंगळवेढा, साेलापूर शहर या भागात भाजपचे दाेन-दाेन गट कार्यरत आहेत. हे गट पक्षाच्या प्रचारात सक्रिय आहेत. परंतु, यांचा एकत्र मेळ घालण्यासाठी पदाधिकाऱ्यांना धावपळ करावी लागत असल्याचे दिसून येते.
यांची प्रतिष्ठा पणाला
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आपली कन्या प्रणिती शिंदे यांच्यासाठी साेलापुरात तळ ठाेकून आहेत. शिंदे हे राज्यातील काँग्रेस ज्येष्ठ नेते आहेत. राज्याचे मुख्यमंत्री व देशाचे गृहमंत्रीपद भूषवितानाही त्यांचा स्थानिक पातळीवर दांडगा संपर्क आहे. भाजपचे राम सातपुते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे भाजपच्या चार आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
- शहरातील सहा दिवसांआड पाणीपुरवठा, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीचे पाडकाम.
- अजूनही सुरू न झालेली विमानसेवा, कांदा निर्यातबंदी, साेयाबीन व इतर शेतमालाचे पडलेले भाव, स्मार्टसिटीचा अपेक्षाभंग.
- शहरातून पुणे, हैदराबादला हाेणारे स्थलांतर, मराठा, धनगर आरक्षण