Shiv Sena: कट्टर शिवसैनिकाची निष्ठा! पाठीवर गोंदवला उद्धव आणि आदित्य ठाकरेंचा टॅटू; पक्षाने केले कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 05:23 PM2022-09-13T17:23:03+5:302022-09-13T17:23:56+5:30
कट्टर शिवसैनिकाने ठाकरे कुटुंब आणि शिवसेनेप्रतीची निष्ठा व्यक्त करण्यासाठी ९ दिवस वेदना, त्रास आणि जखमा सोसत पाठीवर टॅटू गोंदवून घेतला.
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला राज्यभरात मोठे खिंडार पडले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले असून, बैठका आणि दौरे यांवर भर देत पक्ष संघटना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. यातच शिंदे गटाला मिळत असलेला पाठिंबा शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरत आहे. यातच आता एका कट्टर शिवसैनिकाने पक्षावरील निष्ठा व्यक्त करण्यासाठी चक्क पाठीवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो टॅटू स्वरुपात गोंदवून घेतल्याची माहिती मिळाली आहे.
सध्या राज्यात शिंदे गट आणि शिवसेनेचे सुरू असलेले राजकारण सर्वांना परिचित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेवरील निष्ठा व्यक्त करण्यासाठी सोलापुरातील तरुणाने चक्क आपल्या पाठीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे फोटो गोंदून घेतले आहेत. सोलापुरातील शेळगी भागात राहणारे बांधकाम मजूर रामन्ना जमादार हे कट्टर आणि कडवट शिवसैनिक आहेत.
पाठीवर जखमा सोसत ९ दिवसांनी टॅटू पूर्ण
रामन्ना या कट्टर शिवसैनिकाने अनेक वेदना सहन करून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे टॅटू स्वतःच्या पाठीवर गोंदवून घेतले. पाठीवर हे टॅटू काढण्यासाठी रामन्नांना नऊ दिवस लागले आणि अनेक जखमा झाल्या. तब्बल ९ दिवसानंतर हे दोन्ही टॅटू पूर्ण झाले. उद्धव आणि आदित्य ठाकरेंच्या टॅटूसाठी रामाण्णा यांनी त्रास सहन केला. टॅटू गोंदवलेल्या रामन्ना जमादार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना टॅटूची माहिती दिली. उद्धव ठाकरेंनी हात जोडून या शिवसैनिकाचे आभार मानले.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी रामन्ना जमादार यांचे कौतुक करत त्यांना शिवसेना वाढवण्याचे आवाहन केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या शिवसैनिकाने आपल्या पाठीवरील टॅटू आपली शिवसेनेप्रती आणि ठाकरे कुटुंबाप्रति एकनिष्ठा दाखवण्यासाठी काढले. शिवसेनेतील बंडखोरीच्या वातावरणात सोलापूरच्या या शिवसैनिकाची चांगलीच चर्चा रंगली आहे.