सोलापूर महापौर निवड: एमआयएमच्या तटस्थ भूमिकेमुळे भाजपचा मार्ग सुकर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 09:36 AM2019-12-04T09:36:29+5:302019-12-04T09:38:35+5:30
महापौर आणि उपमहापौर पदासाठी बुधवारी सकाळी ११.३० वाजता निवडणूक होत आहे.
सोलापूर : महापौरपदाच्या निवडणुकीत एमआयएमच्या आठ नगरसेवकांनी तटस्थ राहावे, असे आदेश एमआयएमचे जिल्हा निरीक्षक अन्वर सादत यांनी मंगळवारी रात्री दिले. यामुळे महाआघाडीच्या गोटात खळबळ उडाली. तर भाजपच्या उमेदवार श्रीकांचना यन्नम यांचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे यातून स्पष्ट झाले असल्याचे बोलले जात आहे.
महापौर आणि उपमहापौर पदासाठी बुधवारी सकाळी ११.३० वाजता निवडणूक होत आहे. महापौरपदासाठी चार सदस्यांनी अर्ज दाखल केले आहेत. भाजपकडून श्रीकांचना यन्नम तर महाविकास आघाडीने शिवसेनेच्या सारिका पिसे यांची उमेदवारी निश्चित केली आहे. १०२ सदस्य असलेल्या या महापालिकेत भाजपकडे सर्वाधिक ४९ सदस्य आहेत. भाजपनंतर शिवसेना २१, कांग्रेस १४, एमआयएम ९, राष्ट्रवादी ४ वंचित बहुजन आघाडी ३, बसपा १, माकड १ असे पक्षीय बलाबल आहे.
मात्र निवडणुकीच्यावेळी काँग्रेस आणि एमआयएमचे दोन नगरसेवक तांत्रिक कारणांमुळे बुधवारी उपस्थित नसतील. तर १०० सदस्य उपस्थित राहिल्यास बहुमतासाठी ५१ सदस्यांची आवश्यकता असेल. त्यामुळे ४९ सदस्य असलेल्या भाजपला फक्त दोन सदस्यांची आवश्यकता आहे.
तर दुसरीकडे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडीने महाआघाडी केली असून आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा केला आहे. तर याच महाआघाडीत एमआयएम सुद्धा आपल्या सोबत असल्याचा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. मात्र एमआयएमच्या आठ नगरसेवकांनी तटस्थ राहावे, असे आदेश एमआयएमचे जिल्हा निरीक्षक अन्वर सादत यांनी दिल्याने महाआघाडीची अडचणी वाढली आहे. तर भाजपच्या गोटात आनंदी वातावरण असून, श्रीकांचना यन्नम यांचा विजयाचा मार्ग सुकर दिसू लागला आहे.
आम्ही बंडखोरी करणारच: वल्याळ
उपमहापौरपदासाठी नऊ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. यात भाजपकडून राजेश काळे, नागेश वल्याळ, शिवसेनेचे अमोल शिंदे, भारतसिंग बडूरवाले, काँग्रेसचे फिरदोस पटेल, नरसिंग कोळी, एमआयएमच्या तस्लीम शेख, शाहजिदाबानो शेख यांचा समावेश आहे. काळे यांची निवड निश्चित मानली जात असली तरी नागेश वल्याळ बंडखोरीवर ठाम आहेत. वल्याळ यांच्यासोबत भाजपचे सात नगरसेवक आहेत. या सात जणांनी वेगळी भूमिका घेतल्यास महाआघाडीचा उमेदवार विजयी होऊ शकतो.