Praniti Shinde: ईडी म्हणजे पान तंबाखूच्या दुकानासारखी, उद्या माझ्याही घरी येतील: प्रणिती शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 17:33 IST2021-10-24T17:33:23+5:302021-10-24T17:33:47+5:30
Praniti Shinde: सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) सुरू असलेल्या कारवायांबाबत आता काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनीही जोरदार टोलेबाजी केली आहे.

Praniti Shinde: ईडी म्हणजे पान तंबाखूच्या दुकानासारखी, उद्या माझ्याही घरी येतील: प्रणिती शिंदे
सोलापूर-
सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) सुरू असलेल्या कारवायांबाबत आता काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनीही जोरदार टोलेबाजी केली आहे. ''देशात एकंदरच भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मी आज त्यांच्याविरोधात बोलत आहे म्हणून उद्या माझ्याही घरी ईडीवाले येतील. ईडी आता पान तंबाखूच्या दुकानासारखी झाली आहे", अशी खरमरीत टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. त्या सोलापुरात बोलत होत्या.
ईडी आता पान तंबाखूच्या दुकानासारखी झाली आहे. कोणच्याही घरी ईडीचे लोक जातात आणि त्यांना उचलून आणतात, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या. यावेळी प्रणिती शिंदे यांनी ईडीसह इतर केंद्रीय तपास यंत्रणांवरही निशाणा साधला. "जे लोक निर्दोष आहेत त्यांना तुरुंगात टाकलं जातंय. लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाकडून सुरू आहे. ज्यांनी शेतकऱ्यांना मारलं ते लोक आज खुलेपणानं फिरत आहेत", असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.
प्रणिती शिंदे यांनी यावेळी एमआयएम आणि वंचित बहुजन विकास आघाडीवरही जोरदार टीका केली. एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन्ही पक्ष काहीच कामाचे नाहीत. ते भाजपासाठी काम करत आहेत. लोकांना पेटवायचं आणि भांडणं लावायची हेच काम त्यांच्याकडून सुरू आहे, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.