सोलापूरची पैठणी आता ड्रेसच्या रूपात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 12:17 PM2019-05-22T12:17:51+5:302019-05-22T12:20:47+5:30
हातमाग कात टाकतोय; ‘बांगडीमोर’ ब्रँडची देशभरातून मागणी, मोराच्या चित्राचे डिझाईन
महेश कुलकर्णी
सोलापूर : हातमाग हा सोलापूरचा पूर्वीचा मूळ व्यवसाय. कापड गिरण्यांच्या आधी सोलापूरची ओळख केवळ हातमागामुळे होती. हातमागावर विणलेले कपडे देश-विदेशात जात असत. अत्याधुनिक यंत्रसामुग्रीमुळे या व्यवसायात फार कमी विणकर राहिलेले असताना हातमागाच्या ‘सटकपटक’नेही आता ‘कात’ टाकण्यास सुरुवात केली आहे. सोलापूरची खासियत असलेली पैठणी आता ड्रेसच्या रूपात बनली असल्यामुळे रेशमी साडीबरोबरच ‘बांगडीमोर’ या सोलापुरी ब्रँडची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.
सोलापुरातील विणकर विठोबा मोने यांनी खास बनविलेला हा ‘बांगडीमोर’ ब्रँड आहे. या ब्रँडची खासियत म्हणजे पैठणी साडीवर जे मोराचे चित्र असते, तसेच चित्र ड्रेसवरदेखील येते. सोलापूरच्या पैठणीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. साडी ही ठराविक समारंभात वापरली जाऊ शकते. ड्रेस केव्हाही वापरता येत असल्यामुळे महिलांची ही खास पसंती समोर ठेवून हा ब्रँड मोने यांनी बनविला आहे. एका ड्रेसची किंमत साधारण ८ ते १० हजार रुपये असते. एक ड्रेस बनविण्यासाठी साधारण एक आठवडा जातो. साडीइतकाच वेळ ड्रेस मटेरियलला लागतो. मात्र ड्रेस केव्हाही वापरता येतो, ही एक जमेची बाजू असल्याने सोलापूरचे विणकर ड्रेस मटेरियल बनविण्याकडे वळत आहेत.
आंध्र प्रदेशातील धर्मावरम्, अनंतपूर, बंगळूर या ठिकाणाहून संगणकावर तयार करण्यात आलेले खास डिझाईन सोलापुरातील विणकर वापरत आहेत. रेशीम, सिल्क, इरकल, कॉटन, गढवाल, पैठणी हातमागावर तयार करण्याचे काम येथे चालते. आता सिल्क व कान ड्रेस मटेरियलची मागणी होऊ लागली आहे. याप्रमाणे पंजाबी ड्रेसच्या उत्पादनाची सुरुवात झाली आहे. महिन्याकाठी चार ते पाच ड्रेस मटेरियल बनतात. यामध्ये सलवार, कुर्ता आणि दुपट्टा यांचा समावेश असतो. पांढरा, हिरवा, काळा, लाल, गुलाबी, सोनेरी या ग्राहकांच्या पसंतीच्या रंगातील ड्रेस विणले जात आहेत. दुपट्ट्यावरील बारीक सोनेरी नक्षीकाम आणि मुख्य ड्रेसला पैठणी, सिल्क साड्यांसारखे सोनेरी नक्षीकामयुक्त आकर्षक काठ हे येथील वैशिष्ट्य आहे.
आंध्रातील धर्मावरम् येथे संगणकावरील रेशीम साड्यांचे डिझाईन मिळते तर मेहबूबनगर येथील गढवाल रेशीम कॉटन साड्यांचे डिझाईन मिळते. या दोन्ही प्रकारांना देशभरातील विविध ठिकाणाहून मागणी आहे. या दोन्हीपेक्षा वेगळी ‘बांगडीमोर’ हे खास सोलापुरी डिझाईन आता सर्वत्र अव्वल ठरतेय. विशेष म्हणजे मोने यांच्या या ब्रँडला शासनाच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कारही मिळाला आहे. हातमागावर काम करणारी सोलापुरात साधारण २०० ते २५० कुटुंबे आहेत. एका कुटुंबातील दोन जण हातमागावर काम करतात. म्हणजे एकूण ५०० कारागीर या क्षेत्रात आहेत. ही जरी संख्या अल्प असली तरी हातमागावर विणलेले उत्पादन मात्र सुबक आणि सुंदर असते. सोलापुरात हातमागावर तयार झालेल्या कपड्यांना दिल्ली, मुंबई, बेंगलोर, हैदराबाद या ठिकाणी चांगली मागणी आहे.
निवृत्तीवेतनाचा लाभ किती जणांना-मोने
- असंघटित कामगारांना पेन्शन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेत हातमाग कामगारांचाही समावेश करण्यात आला आहे. या योजनेत सहभागी झालेल्या कामगारांना निवृत्तीनंतर दरमहा तीन हजार रुपयांची पेन्शन मिळणार आहे. सोलापुरात हातमागावर काम करणाºया कारागिरांची संख्या केवळ ४०० ते ५०० च्या आसपास आहे. अठरा ते ४० वयोगटातील कारागिरांना या पेन्शनसाठी नोंदणी करता येणार आहे. या वयात बसणारे १०० विणकरही नसतील. त्यामुळे या योजनेचा खरा लाभ संख्येने कमी असलेल्या विणकरांना मिळणार का, असा सवाल विठ्ठल मोने यांनी केला.
येथे चालतो हातमाग...
- शहरातील हातमागावर साड्या, वॉल हँगिंग बनविण्याचे प्रमाण जास्त असून त्याबरोबरच टॉवेल, धोती विणले जातात. विष्णुनगरसह देसाईनगर, ललितानगर,गीतानगर, बोळकोटे नगर, स्वागतनगर, वेणुगोपाल नगर, माधवनगर, विडी घरकूल, यल्लालिंग नगर, सुनील नगर, अक्कलकोट रोड एमआयडीसी, अशोक चौक, साईबाबा चौक, श्रमजीवी नीलमनगर, शेळगी या ठिकाणी हा व्यवसाय आहे. यामध्ये हातमाग, भीममाग, वॉल हँगिंगद्वारे वस्त्रनिर्मिती करणारे कारागीर विखुरलेले आहेत.
तीन मीटर दुपट्टा अडीच मीटरचा पन्ना
- ‘बांगडीमोर’ या ड्रेस मटेरियलच्या प्रकारात ड्रेस आणि टॉप ३ मीटर असतो तर दुपट्ट्याला ४८ इंचाचा पन्ना असतो. टॉपला आणि दुपट्ट्याला दोन्ही बाजूने ‘पैठणी’फेम मोराचे चित्र आहे. यामध्ये निळा, सोनेरी, पिवळा, दुधी, हिरवा, वाईन, ब्लॅक राणी, निळा-रामा, गुलाबी, केशरी असे विविध रंग आहेत.