कडक salute; शेतकरी कर्जमाफीसाठी फौजदाराने दिला एक महिन्याचा पगार!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 09:28 AM2019-12-06T09:28:24+5:302019-12-06T09:34:19+5:30
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असल्याचे दिसत आहे.
माढा : शेतकरी पुत्र असल्याची भावना लक्षात घेऊन सहायक फौजदार असलेल्या माढा येथील रमेश मांदे यांनी एक पाऊल उचलत आपला स्वत:चा एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देऊ केला आहे. कोरड्या तसेच ओल्या दुष्काळामुळे संंकटात असलेल्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी धनादेश स्वीकारुन शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केले आहे.
त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्याकरिता महाराष्ट्र शासनाचे सर्व कर्मचारी व महाराष्ट्र शासनात काम करणारे केंद्र शासनाचे कर्मचारी व राज्याचे सर्व मंत्री, आमदार यांच्या पगारातील १५ दिवसांचा पगार कपात करून तो निधी शेतकरी कर्जमाफीसाठी वापरण्याची विनंती देखील केली आहे.
पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची भावना शेतकऱ्यांच्या प्रति संवेदनशील असल्याचे स्पष्ट करताना पगाराचा ४४ हजार १०० रुपयांचा धनादेशदेखील कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री यांच्या नावावर पाठवला आहे. ही घटना संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सुखावणारी आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांनी कर्जमाफी मिळावी, यासाठी एक महिन्याचा पगार मी शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारला देत आहे. यासाठीचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला सुपूर्द करण्यात येणार आहे. - सहायक पोलीस फौजदार रमेश मांदे