सोलापूर जिल्हा परिषदेने चमकोगिरीच्या नादात मानवाधिकाराचे केले उल्लंघन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 10:49 AM2017-10-07T10:49:25+5:302017-10-07T10:51:43+5:30
जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने स्वत:च्या चमकोगिरीसाठी उघड्यावर शौचास गेलेल्या महिलेच्या गळ्यात हार घालून फोटो सेशन करण्याचा प्रताप केला.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ७ : जिल्हा हागणदारीमुक्त झाला पाहिजे, त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केलेच पाहिजेत, परंतु, स्वच्छता अभियानाच्या नावाखाली अगदी मानवाधिकाराचे उल्लंघन करून आणि तेही महिलेल्या अवमानाची तमा न बाळगता जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने स्वत:च्या चमकोगिरीसाठी उघड्यावर शौचास गेलेल्या महिलेच्या गळ्यात हार घालून फोटो सेशन करण्याचा प्रताप केला. गंभीरबाब म्हणजे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांनी यामध्ये सहभागी घेतल्याचे छायाचित्र माध्यमांच्या हाती लागले आहे. या प्रकाराबद्दल सर्वस्तरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सांगोला तालुक्यातील चिक महूद गावची आज पहाटेची ही संतापजनक घटना. सोलापूर जिल्ह्यातील ८५० गावे हागणदारीमुक्त झाल्याचा दावा जिल्हा परिषद प्रशासन करीत आहे. उर्वरित १७७ गावांसाठी प्रशासन विशेष मोहीम राबवित आहे. गावांमधील मंडळे, सामाजिक संस्था यांनाही यात सहभागी करून घेतले जात आहे. स्वच्छता हीच सेवा या कार्यक्रमांतर्गत जिल्हाभर दौरे करून ग्रामस्थांशी संवाद साधणारे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड दोन दिवस सांगोल्याच्या दौºयावर होते़ या दौºयात त्यांनी चिकमहुद या गावास भेट देऊन ग्रामपंचायत कार्यालयात सहकाºयांसह मुक्काम केला़ गुरुवारी रात्री ८.३० वाजता मशाल फेरी काढून ग्रामस्थांशी संवाद साधला. पहाटे ५ वाजता डॉ. भारुड यांच्यासह जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांनी गुडमॉर्निंग पथक बनून उघड्यावर शौचास जाणाºयांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. शौचास निघालेल्या काही महिला आणि पुरुषांचे फूल देऊन स्वागत करण्यात आले. कहर म्हणजे एका महिलेच्या गळ्यात हार घालून फोटोसेशनही करण्यात आले. हे फोटो माध्यमांनाही पाठवण्यात आले होते. यातील एक वादग्रस्त फोटो दुपारी व्हायरल झाला आणि जिल्हा परिषदेचे प्रशासन टीकेचे धनी ठरले.
-----------------------
हा तर कायदा हातात घेण्याचा प्रकार
समोरचा माणूस गुन्हेगार असला तरी गुन्हा सिद्ध होईपर्यंत तो निर्दोष असतो. आपल्या संविधानाने गुन्हेगारांना कोणत्या प्रकारे शिक्षा करावी, याबाबत स्पष्टपणे सांगितले आहे. चिकमहूदमध्ये शौचास गेलेल्या महिलेच्या गळ्यात हार घालणे आणि त्याचे फोटो काढणे हा भयानक आणि कायदा हातात घेण्याचा प्रकार आहे. तुम्हाला असे कुणालाही अपमानास्पद वागवता येत नाही. तुम्हाला जागेवरच न्यायनिवाडा करता येत नाही. त्या महिलेच्या घरात शौचालय असेल आणि पाणी नसल्यामुळे ती बाहेर गेली असेल किंवा इतरही अनेक कारणे असतील. ती कारणे समजून न घेता तुम्ही भररस्त्यावर तिच्यावर कारवाई करू शकत नाही. तिला अपमानित करू शकत नाही. मानवाधिकारांचे उल्लंघन करणाºयांवर कडक कारवाई झालीच पाहिजे, असे मत सामाजिक कार्यकर्त्या अॅड. सरोजनी तमशेट्टी यांनी व्यक्त केले.
-------------------
हे फोटो कुणालाही पाठवू नका, असे मी सांगितले होते. ते कुणी काढले, व्हायरल कुणी केले मला माहीत नाही. त्या महिलांचा सत्कार आम्ही केलेला नाही तर गावातीलच बचत गटाच्या महिलांना करायला लावला आहे. फोटोसेशन चुकीचे आहे, असे माझे व्यक्तीगत मत आहे.
-डॉ. राजेंद्र भारुड,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर