आषाढी यात्रेत सोलापूर जिल्हा परिषद करणार चंद्रभागेच्या तीर्थाचे ब्रँडिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 04:09 PM2019-06-12T16:09:42+5:302019-06-12T16:11:47+5:30
पंढरपुरात आषाढी यात्रेची लगभग; मानकरी व महत्त्वाच्या व्यक्तींना होणार वाटप
सोलापूर : आषाढी यात्रेत जिल्हा परिषदेतर्फे चंद्रभागेतील तीर्थाचे ब्रँडिंग करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
८ ते १२ जुलैदरम्यान पंढरपुरात होणाºया आषाढी सोहळ्याची तयारी जिल्हा प्रशासनातर्फे सुरू आहे. याबाबत ३0 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली होती. या बैठकीत प्रत्येक खात्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेकडे स्वच्छता, पाणीपुरवठा व आरोग्याची जबाबदारी आहे. या अनुषंगाने करावयाच्या तयारीबाबत डॉ. भारूड यांनी खातेनिहाय बैठका घेऊन जबाबदारी निश्चित केली आहे. यात्रा काळात पंढरपुरात ३२ दिंड्या व मानाच्या सहा पालख्या दाखल होतात. पालखी व दिंडी मार्गावरील स्वच्छता, पाणीपुरवठा आणि आरोग्य व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. मानाच्या पालखीबरोबरच्या ६ आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने उपलब्ध केलेल्या २0 टँकरमध्ये शुद्ध पाणी भरण्यासाठी साडेपंधरा लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
प्रशासकीय या तयारीबरोबर आषाढी यात्रेचे वैशिष्ट्य व इतर तीर्थक्षेत्रांप्रमाणे पंढरपूरचे महत्त्व ओळखून जिल्हा परिषदेतर्फे चंद्रभागेचे तीर्थ मानकरी व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. वारी काळात चंद्रभागेत स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी असते. त्याचबरोबर चंद्रभागेतील पवित्र तीर्थ अनेक जण बाटलीत भरून नेतात. देशातील इतर तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी असलेल्या नद्यांचे महत्त्व सांगितले जाते व त्याचे तीर्थ तांब्याच्या पात्रात उपलब्ध करून दिले जाते. देवदर्शनानंतर भाविक हे तीर्थ घरी नेतात व पूजेच्या वेळी त्याचा वापर केला जातो किंवा वर्षभर पूजन केले जाते. याच धर्तीवर चंद्रभागेच्या तीर्थाचे महत्त्व भाविकांच्या लक्षात यावे म्हणून यंदा आषाढी यात्रेत हा नवीन प्रयोग केला जाणार आहे, असे डॉ. भारूड यांनी स्पष्ट केले.
तीर्थांचे महत्त्व सांगणार
चंद्रभागेच्या पात्रातील शुद्ध पाणी तीर्थ म्हणून तांब्याच्या भांड्यात भाविकांसाठी उपलब्ध केले जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर यंदाच्या आषाढी यात्रेच्या पूजेसाठी येणाºया अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, पालखी व दिंडीचे प्रमुख, पूजेचा मान मिळणाºया वारकरी दांपत्यास हे तीर्थ भेट देण्यात येणार आहे. यासोबत चंद्रभागेच्या तीर्थाचे महत्त्व स्पष्ट करणारी माहिती उपलब्ध केली जाणार आहे.
कुंभमेळाव्याचा अनुभव
- उत्तर प्रदेशात ३ ते ५ मार्च या कालावधीत झालेल्या कुंभमेळाव्याचा अभ्यास करण्यासाठी झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांची निवड शासनाच्या पाणीपुरवठा विभागाने केली होती. उत्तर प्रदेश शासनाने स्वच्छताविषयक विविध उपक्रम भाविकांसाठी हाती घेतले होते. यासाठी वापरण्यात आलेले मनुष्यबळ, केलेल्या उपाययोजना, इतर विभागांशी केलेला समन्वय, आर्थिक तरतूद, जनजागृतीसाठी केलेल्या उपाययोजना, भाविकांसाठी उपलब्ध केलेल्या स्वच्छताविषयक सुविधा यांचा त्यांनी अभ्यास केला. या अनुभवावरून आषाढी यात्रेत अनेक बदल दिसतील, असे डॉ. भारूड यांनी सांगितले.