यशवंत पंचायत राज अभियानात सोलापूर जिल्हा परिषदेचा दुसरा क्रमांक
By admin | Published: April 3, 2017 06:11 PM2017-04-03T18:11:32+5:302017-04-03T18:11:32+5:30
.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ३ : यशवंत पंचायत राज अभियानात प्रशासन व विकास कार्यात उत्कृृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्या यांनी २०१५-१६ या आर्थिक वर्षामध्ये केलेल्या कामाचे मुल्यमापन परीक्षेत सोलापूर जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक मिळाला आहे़ प्रथम क्रमांक लातूर जिल्हा परिषदेने पटकाविला आहे़
राज्यस्तरावर उत्कृष्ट पंचायत राज संस्थांची निवड करण्यासाठी राज्यस्तरीय मुल्यांकन समितीची बैठक १७ मार्च २०१६ रोजी घेण्यात आली होती़ राज्यस्तरीय परितोषिक निवड समितीने, राज्यस्तरीय पडताळणी समितीकडून प्राप्त झालेल्या अहवालावर अभ्यास करून राज्यातील उत्कृष्ट तीन जिल्हा परिषदा व तीन पंचायत समित्यांची निवड केली़ यात लातुर जिल्हा परिषद प्रथम, सोलापूर जिल्हा परिषद व्दितीय तर जळगांव जिल्हा परिषदेचा तृतीय क्रमांक आला आहे़ पंचायत समिती स्तरावर पंचायत समिती, खानापूर विटा जि़ सांगलीचा प्रथम, पंचायत समिती देवगड, जि़ सिंधुदुर्गचा व्दितीय तर पंचायत समिती अचलपूर जि़ अमरावतीचा तृतीय क्रमांक आला आहे़ तसेच विभागास्तरावर अक्कलकोट पंचायत समितीला तृतीय परितोषिक प्राप्त झाले आहे़ सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेतील अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे सोलापूर जिल्हा परिषदेचा व्दितीय क्रमांक राज्यात आला आहे़ त्यामुळे सोलापूरचा झेंडा राज्याच्या नकाशावर अटकेपार लागला आहे़ या यशाबद्दल जिल्हा परिषदेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे़