सोलापूर प्राणिसंग्रहालयात 'मकाऊ'सह आफ्रिकन पक्षी दाखल

By admin | Published: October 26, 2016 01:26 PM2016-10-26T13:26:02+5:302016-10-26T13:26:02+5:30

मनपाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात मंगळवारी आफ्रिकन पोपटाच्या सात जाती, मसकली कबूतर व तुर्कस्तानच्या टर्की आदी ९ प्रकारांचे पक्षी दाखल झाले.

In the Solapur zoo, the birds with 'Macau' were attacked | सोलापूर प्राणिसंग्रहालयात 'मकाऊ'सह आफ्रिकन पक्षी दाखल

सोलापूर प्राणिसंग्रहालयात 'मकाऊ'सह आफ्रिकन पक्षी दाखल

Next

 ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. २६ -  मनपाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात मंगळवारी आफ्रिकन पोपटाच्या सात जाती, मसकली कबूतर व तुर्कस्तानच्या टर्की आदी ९ प्रकारांचे पक्षी दाखल झाले. आफ्रिकन 'मकाऊ' या जातीच्या पोपटाच्या हालचालीने पर्यटकांचे लक्ष वेधले आहे. 
 
मनपाच्या स्थायी सभेत पक्षी खरेदीला मान्यता दिली होती. त्याप्रमाणे जिल्हा वन अधिकारी पालकर, पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. कुलकर्णी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज रापतवार, सहायक लेखाधिकारी मुंढेवाडी व प्राणिमित्र निनाद शहा यांच्या समितीने पक्षी निवडीबाबत मार्गदर्शन केले. त्यावरून हैदराबाद येथून ९ प्रकारांचे पक्षी खरेदी करण्यात आले. सोमवारी रात्री हे पक्षी येथील प्राणिसंग्रहालयात दाखल झाले. यामध्ये आफ्रिकन मकाऊ, ग्रे पॅरट, संकेनूर, रोझीला, मसकली, जावा, लव्हबर्ड, पीझंट आणि टर्की या पक्ष्यांचा समावेश आहे. 
 
यातील आफ्रिकन मकाऊची जोडी खास आकर्षण आहे. या जोडीला प्राणिसंग्रहालयाच्या प्रवेशद्वारावरील पिंजर्‍यात ठेवण्यात आले आहे. त्यांचा गोंगाट पर्यटकांचे लक्ष वेधतो. भारतीय पोपटापेक्षा दुपटीने मोठा असलेला अत्यंत रुबाबदार असा हा पक्षी आहे. याचे आयुष्य ८0 ते १00 वर्षे असून, खाण्यासाठी सर्व प्रकारची फळे, शेंगदाणे, ड्रायफूड, वाटाणे, कोबी, कडधान्ये लागतात. दोन वर्षांची ही जोडी असून, मॅगी असे त्यांचे नाव आहे. मॅगी कम म्हटले की हा पोपट हात किंवा खांद्यावर येऊन बसतो व मॅगी गो म्हटल्यावर परत आपल्या ठिकाणी जातो. या जोडीची किंमत तीन लाख रुपये आहे. ग्रे पॅरटची जोडी आकर्षक आहे. सर्वांग ग्रे रंगाचा तर लाल शेपटीचा हा पक्षी अत्यंत रुबाबदार दिसतो. यांचेही आयुष्य १00 वर्षांचे. ८0 हजाराला ही जोडी खरेदी करण्यात आली आहे. 
 
संकेनूरची जोडी विलोभनीय दिसते. डोक्यावर पिवळसर हिरवा रंग तर सर्वांग हिरवे व त्यावर पिवळे ठिपके असे नैसर्गिक रूप या पक्ष्याला लाभले आहे. ५0 हजाराला ही जोडी खरेदी करण्यात आली आहे. रोझीला ही जोडी मात्र अत्यंत लक्षवेधक आहे. पंखांना गुलाबासारखा रंग आहे. नर व मादीला वेगवेगळा रंग आहे. यांची चोच पोपटाप्रमाणेच असली तरी अत्यंत लहान आहे. या जोडीची किंमत ३५ हजार इतकी आहे. मसकली ही एक कबुतराची जात आहे. पांढर्‍या रंगाची ही कबुतरे असून, त्यांच्या पायांनाही पंख आहेत. आफ्रिकन जावा हे भारतीय चिमण्याच्या आकाराचे पोपट असून, तीन रंगांत आढळतात. ग्रे, सिल्व्हर, व्हाईट या तिन्ही रंगांच्या दहा जोड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. आफिक्रन लव्हबर्ड पिवळ्या रंगाचे आहेत. पीझंटचा रंगही लालकेशरी, पिवळा असा मिश्र स्वरूपाचा असल्याने तो अत्यंत देखणा दिसतो. तुर्कस्तानमधील टर्की या पक्ष्याच्या दोन जोड्या आहेत. नर पांढर्‍या रंगाचे तर मादी लांडोरासारखी दिसते. यांच्या गळ्याला खालून फुगणारा तुरा आहे.                                                                                                                                                                                         
दिवाळीच्या सुट्टीत प्राणिसंग्रहालयात जाणार्‍या शाळकरी मुलांना या पक्ष्यांचे आकर्षण राहणार आहे. त्यात 'मकाऊ' ही जोडी त्यांच्या मूडप्रमाणे साद घालणार्‍यांना प्रतिसाद देईल. सध्या हे सर्व पक्षी नवीन वातावरणात आल्यामुळे गांगरल्यासारखे दिसत होते. त्यांची सुरक्षा व आहार याकडे लक्ष द्यावे लागणार असल्याचे डॉ. रापतवार म्हणाले. यापूर्वी चार बिबटे दाखल झाल्याने प्राणिसंग्रहालयाचे आकर्षण वाढले होते. 
 
आता त्यात या नवीन ९ जातींच्या पक्ष्यांची भर पडली आहे. या पक्ष्यांबरोबर त्यांना सांभाळणारे म. गौस (रा. चार मिनारजवळ, हैदराबाद) हे दाखल झाले आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून देशभरात देशीपरदेशी जातीचे पाळीव पक्षी विक्री व संगोपनाचे ते काम करतात. महापालिकेने त्यांच्याकडून हे पक्षी विकत घेतले आहेत. प्रत्येक पक्ष्याचा आहार व आवडीनिवडी याबाबत हँडलरना माहिती देण्यासाठी दोन दिवस ते प्राणिसंग्रहालयात थांबणार आहेत. डॉ. पंकज रापतवार यांनी प्रत्येक पक्ष्याबाबत अगोदरच माहिती जाणून घेतली असून, त्याप्रमाणे त्यांची ठिकाणे निश्‍चित केली आहेत.

Web Title: In the Solapur zoo, the birds with 'Macau' were attacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.