ताज बागसाठी करणार सोलर विजेचा वापर

By admin | Published: June 24, 2016 06:15 PM2016-06-24T18:15:47+5:302016-06-24T18:15:47+5:30

ताजबाग विकास आराखडा राबविताना ताजबागमधील संपूर्ण विजेची उपकरणे सोलरवर चालवा.

Solar power consumption for Taj garden | ताज बागसाठी करणार सोलर विजेचा वापर

ताज बागसाठी करणार सोलर विजेचा वापर

Next

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 24 - ताजबाग विकास आराखडा राबविताना ताजबागमधील संपूर्ण विजेची उपकरणे सोलरवर चालवा. तसेच सोलरचा उपयोग करून ताजबागसाठी स्वतंत्र पिण्याच्या पाण्याची योजना तयार करा. मनपाच्या पाणीपुरवठ्याशिवाय ताजबागची स्वत:ची जलस्रोत योजना असावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
ताजबाग विकास आराखड्यांतर्गत सुरु असलेल्या कामाचा आढावा आज रविभवन येथे पालकमंत्र्यांनी घेतला. या बैठकीला आमदार सुधाकर कोहळे, नासुप्र सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित होते.
ताजबागच्या एकूण 83 एकर जागेपैकी 30 एकर जागा वापरात आहे. विकासकामे करताना अतिक्रमण हटवून कामे केली जात आहेत. या संपूर्ण परिसराचा विकास केल्यानंतर लागणाऱ्या विजेची आवश्यकता सोलर विजेच्या माध्यमातून पूर्ण करा. संपूर्ण ताजबाग सोलरवर आणले तर मोठ्या प्रमाणात वीजबिलाची बचत होईल. तसेच येथे लागणाऱ्या पाण्यासाठी एक मोठे बोअर वेल तयार करून त्यासाठीही सोलर पंपाचा उपयोग करावा, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली. यामुळे वीजबिल व पाणी बिलापोटी होणाऱ्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होईल.
ताजबाग विकास आराखडा 132 कोटींचा असून, त्यापैकी 27.5 कोटी रुपये नासुप्रला प्राप्त झाले. यापैकी 22 कोटी रुपये खर्च झाले आहेत. या जागेवरील जे लोक विस्थापित झाले त्यांच्यासाठी बांधण्यात येत असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधकाम पूर्ण झाले आहे. 19 ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष नासुप्रचे असून, तोपर्यंत सर्व कामे पूर्ण होतील. एकूण 136 दुकाने तयार झाली आहेत.
ताजबागला लागून असलेल्या नाल्याच्या संरक्षण भिंतीचे काम पूर्ण झाले असून, त्यासाठी 71.81 लक्ष रुपये खर्च करण्यात आले. उर्स मैदानाच्या संरक्षण भिंतीचे कामही पूर्ण झाले आहे. त्यासाठी 29 लाख रुपये खर्च करण्यात आले. ताजबाग सुशोभीकरणाचा 33 कोटींचा आराखडा असून संपूर्ण काम शासन करणार आहे. ताजबागचा मुख्य रस्ता व परिसरातील सर्व रस्ते सिमेंटचे करण्याचे निर्देशही पालकमंत्री बावनकुळे यांनी याप्रसंगी दिले.
दुकाने वाटपाची पद्धत, नियम, करार, देखभाल दुरुस्ती अन्य सर्व बाबींसाठी आमदार सुधाकर कोहळे यांच्या अध्यक्षतेखाली नासुप्र सभापती व ट्रस्टचा एक पदाधिकारी अशी तीन सदस्यीय समिती गठित करा. या समितीने दुकाने वाटपाची पद्धत व नियम तयार करुन पालकमंत्र्यांच्या समितीला 15 दिवसांत सादर करावे, असे निर्देशही बावनकुळे यांनी दिले.
कामे पूर्ण झाल्यानंतर दुकाने हस्तांतरण प्रक्रिया व पध्दती हीच समिती ठरवेल. तसेच कार्य पूर्ततेचे प्रमाणपत्र मिळण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने कामाचा दर्जा तपासणी पथक कामाची तपासणी करेल. त्यानंतर काम पूर्ण झाल्याचा अहवाल आल्यानंतर दुकानांचे हस्तांतरण केले जाईल. पुढील आठवड्यात ताजबाग विकासकामांची पाहणी आपण करणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
संपूर्ण ताजबागमध्ये सोलर दिव्यांचा वापर करण्यासाठी सल्लागार नेमून आराखडा तयार करण्यात येईल. महाऊर्जा कंपनीला सविस्तर आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात येतील, असेही पालकमंत्री म्हणाले.
राष्ट्रीय ग्राहक आयोग
राष्ट्रीय ग्राहक आयोग व ग्राहक न्यायालयासाठी सदर पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस असलेली एक शासकीय जागा देण्यास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंजुरी दिली. या जागेवर दोन तळमजले पार्किंगचे व दोन मजले ग्राहक आयोग आणि दोन मजल्यांवर ग्राहक न्यायालयासाठी जागा दिली जाईल.
कामठी आयटीआयसाठी जागा देण्यास पालकमंत्र्यांनी मंजुरी दिली. तसेच मौदा येथील दिवाणी न्यायालयासाठी महावितरणची जागा देण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. महिनाभरात या दोन्ही जागा दिल्या जातील.
मौदा तालुक्यातील बाबदेव साखर कारखान्याजवळील बंधाऱ्यात पाणी साठवण्यासाठी येणार खर्च जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यात येईल व लिफ्ट इरिगेशनसाठी सोलरच्या विजेचा उपयोग करुन पाणी शेतीला व गावकऱ्यांना देण्यात येईल.

 

Web Title: Solar power consumption for Taj garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.