आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत सौरपंप
By admin | Published: October 22, 2015 01:14 AM2015-10-22T01:14:03+5:302015-10-22T01:14:03+5:30
राज्यातील सहा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सौर कृषिपंप देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना पाच टक्के रक्कम भरायची असून, प्रथम
मुंबई : राज्यातील सहा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सौर कृषिपंप देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना पाच टक्के रक्कम भरायची असून, प्रथम येणाऱ्यास प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी महावितरणच्या नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ आणि वर्धा या सहा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सौर कृषिपंप देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
विद्युत जोडणी नसल्यामुळे शेती उत्पन्नावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांवर विपरित परिणाम होऊ नये, तसेच कृषिपंपाला किफायतशीर वीजपुरवठा मिळावा व विजेचे बील भरण्यापासून त्याची कायमस्वरुपी सुटका व्हावी, यासाठी शासनाने
१0 हजार सौर कृषिपंप
बसविण्याचा पथदर्शी प्रकल्प राज्यात राबविण्याचे ठरविले आहे. त्यानुसार ३ ते ५ अश्वशक्तीचे
हे कृषिपंप पाच एकर किंवा
त्यापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात बसविले जाणार आहेत. (प्रतिनिधी)
महावितरणकडून घेता येणार लाभ
शासनाच्या धडक सिंचन योजनेंतर्गत विहिरीचा लाभ घेतलेले शेतकरी, अतिदुर्गम भागातील शेतकरी, पारंपरिक पद्धतीने विद्युतीकरण न झालेली गावे, विद्युतीकरणासाठी वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले भाग व महावितरणकडे पैसे भरून ज्यांना तांत्रिक अडचणींमुळे नजीकच्या काळात वीजपुरवठा करणे शक्य नसलेले सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात, असे महावितरणने कळविले आहे.
३ अश्वशक्ती ए.सी.पंपासाठी शेतकऱ्यांना १६ हजार २00 रुपये भरावे लागणार आहेत, तर ३ अश्वशक्ती डी.सी.पंपासाठी २0 हजार २५0, ५ अश्वशक्ती पंपासाठी २७ हजार, ५ अश्वशक्ती डी.सी.पंपासाठी ३३ हजार ७५0 आणि ७.५ अश्वशक्ती ए.सी.पंपासाठी ३६ हजार रुपये शेतकऱ्यांना जमा करावे लागणार आहेत. हे सौर कृषिपंप बसविल्यापासून पाच वर्षे देशभाल दुरुस्तीची पूर्ण जबाबदारी पुरवठादार एजन्सीची राहणार आहे.