१० पोती कांदे विकले, मिळाली २ रुपये पट्टी; लाज बाळगा, शेतकऱ्यांनी जगायचं कसं?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 08:54 AM2023-02-23T08:54:45+5:302023-02-23T08:55:01+5:30
१० पिशव्या कांद्याचे वजन ५१२ किलो झाले. त्याला भावही एक रुपया किलो मिळाला. विकलेला कांदा, त्याचे वजन आणि भाव पाहता कांद्याचे एकूण ५१२ रुपये झाले
सोलापूर - सध्या कांद्याला मिळणारा भाव कमी झाला आहे, उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी पूर्णपणे हताश झाला आहे. एका शेतकऱ्याने सोलापूर बाजार समितीत १० पोते कांदा विकला अन् त्याला केवळ २ रुपये पट्टी मिळाली आहे. अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव येथील राजेंद्र तुकाराम चव्हाण या शेतकऱ्याने सोलापुरातील बाजार समितीत १० पोते कांदे विकण्यास आणले होते. लिलाव झाला अन् भाव मिळाला. पट्टी तयार करण्यासाठी अडत व्यापाऱ्याने पावती पुस्तक काढले तेव्हा शेतकऱ्याला केवळ दोन रुपये ४९ पैसे देणे निघाले.
१० पिशव्या कांद्याचे वजन ५१२ किलो झाले. त्याला भावही एक रुपया किलो मिळाला. विकलेला कांदा, त्याचे वजन आणि भाव पाहता कांद्याचे एकूण ५१२ रुपये झाले. त्यामधून हमाली ४०.४५ रुपये, तोलाई २४.०६ रुपये, मोटारभाडे १५, रोख उचल ४३० असा खर्च वजा जाता १० पोते कांदे विकल्यावर फक्त २ रुपये ४९ पैसे पट्टी मिळाली. या पट्टीची चिठ्ठी अन् अडत्याने शेतकऱ्याला दिलेला चेक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रस्त्यावर कांदे, द्राक्षे फेकत शेतकरी आक्रमक
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे बुधवारी वणी-नाशिक रस्त्यावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. याप्रसंगी शेतकऱ्यांनी कांदे व द्राक्षे रस्त्यावर फेकत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. वणी-नाशिक रस्त्यावर दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या पिकास योग्य भाव मिळावा, यासाठी रास्ता रोको आंदोलन छेडले होते. ‘जय जवान, जय किसान’ शेतकरी एकजुटीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
या पट्टीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर शेतकरी वर्गामधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राज्यकर्त्यांनो, जरा तरी लाज बाळगा, शेतकऱ्यांनी जगायचं कसं हे आता तुम्हीच सांगा? एका बाजूला थकबाकीपोटी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन धडाधड तोडता आणि डोळ्यांसमोर पीक करपून जातं. दुसरीकडे शेतात पिकविलेल्या पिकांना याेग्य भाव मिळत नसल्याची खंत अनेक शेतकऱ्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.