छोट्या भावाला वाचविताना बहिणही विहिरीत बुडाली
By admin | Published: July 6, 2015 02:21 AM2015-07-06T02:21:10+5:302015-07-06T02:21:10+5:30
सायकलवरील ताबा सुटून विहिरीत पडलेल्या छोट्या भावाला वाचविण्यासाठी जिवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारलेल्या बहिणीलाही जलसमाधी मिळाल्याची दुर्दैवी घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली.
श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : सायकलवरील ताबा सुटून विहिरीत पडलेल्या छोट्या भावाला वाचविण्यासाठी जिवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारलेल्या बहिणीलाही जलसमाधी मिळाल्याची दुर्दैवी घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली.
येळपणे शिवारातील पोलीसवाडी येथे झालेल्या दुर्घटनेत ऋतुजा रवींद्र पवार (१२) व हृषीकेश रवींद्र पवार (९) या शाळकरी भावंडांचा शनिवारी दुपारी मृत्यू झाला. शनिवारी सकाळी शाळा सुटल्यानंतर ऋतुजा व हृषीकेश सायकलवरून शेतात आई, वडिलांकडे गेले होते. आई-वडिलांनी त्यांना जाताना जनावरे घरी नेण्यास सांगितले. हृषीकेश सायकल चालवत होता तर ऋतुजा पायी चालत होती. रस्त्यावर सायकल चालवताना उतरण असल्याने ताबा सुटून हृषीकेश विहिरीत पडला. ऋतुजाने त्यानंतर मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र तिला कोणीही न दिसल्याने तिने
विहिरीत उडी मारली. मात्र दोघांचा पाण्यात पडून मृत्यू झाला. ऋतुजा सहावीत तर हृषीकेश इयत्ता तिसरीत शिकत होता. मागील महिन्यात तालुक्यातील भापकरवाडीत बैलगाडी विहिरीत पडून सोहेल भापकर (७) याचा मृत्यू झाला. आता हृषीकेश व ऋतुजा या भावंडांचा मृत्यू झाला.
श्रीगोंदा तालुक्यातील बऱ्याच विहिरींना कठडे नसल्याने त्या धोकादायक बनल्या आहेत.
बहिणीची माया
विहिरीतून दोघांचे मृतदेह बाहेर काढल्यानंतर ऋतुजाने हृषीकेशचा हात घट्ट पकडलेला असल्याचे आढळले. हृषीकेशने बहिणीला घट्ट मिठी मारल्याचे हृदयद्रावक चित्र पाहून विहिरीच्या काठावरील लोकांचे डोळे पाणावले.