स्वाभिमानीत राजू शेट्टींचा एकट्याचा आक्रोश- सदाभाऊ खोत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 02:50 AM2019-08-04T02:50:20+5:302019-08-04T06:44:43+5:30
खासदारकीचा तुकडा मिळण्यासाठी अभद्र युती केल्याचा आरोप
सातारा : ‘खासदारकीचा तुकडा मिळण्यासाठी राजू शेट्टींनी अभद्र युती केली. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ त्यांच्या ताब्यात राहिला नाही. बिनीचे सरदारही त्यांच्यापासून दुरावले आहेत. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते आक्रोश करणार असल्याचे सांगत आहेत, वास्तविक, आक्रोश करायला त्यांच्या पक्षात ते एकटेच उरले आहेत,’ अशी टीका कृषी राज्यमंत्री व रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी केली.
सातारा येथे पत्रकार परिषदेत खोत म्हणाले, ‘आघाडी सरकार १५ वर्षे सत्तेवर होते. त्या सरकारसोबत शेतकरी संघटनेने अखंडपणे संघर्ष केला. दूध, ऊस, कापूस, सोयाबीन या उत्पादनांना हमीभाव देण्याची मागणी करणाºया शेतकऱ्यांना तेव्हा गोळ्या घालण्यात आल्या. संघटनेचे अनेक कार्यकर्ते अजूनही कोर्टात हेलपाटे मारत आहेत. अनेक शेतकरी मरण पावले. संघटनेचे नेतृत्व करणाऱ्या राजू शेट्टींनी मात्र राजकारणात आपले भवितव्य टिकून राहावे, यासाठी प्रस्थापितांसोबत अभद्र युती केली. मी भाजपसोबत गेलो तर माझीच माणसे माझ्याविरोधात हत्यारासारखी वापरली. शेट्टींना शेतकºयांच्या प्रश्नाचं देणं-घेणं राहिलेलं नाही.’
राजू शेट्टी आक्रोश यात्रेबाबत खोत म्हणाले, ‘अकरा प्रश्नांचं उत्तर मिळविण्यासाठी ते आता आक्रोश यात्रा काढणार आहेत. शेतकरी कार्यकर्ते त्यांच्यासोबत राहिलेले नाहीत, आता त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही. त्यांच्या एकट्याचाच आक्रोश सुरू आहे.नटसम्राट नाटकासारखी ‘खासदारकी देता का खासदारकी’ अशी त्यांची अवस्था झालेली आहे.’
राजू शेट्टी ज्या इव्हीएमविरोधात आंदोलन करायला उठले आहेत, त्या इव्हीएमच्या माध्यमातून ते दोनदा कसे काय निवडून आले. बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची इच्छा असेल तर आमचा त्यालाही पाठिंबा राहील, असे स्पष्टीकरणही खोत यांनी केले.
विधानसभेसाठी रयत क्रांती १२ जागांसाठी आग्रही
विधानसभा निवडणुकीसाठी रयत क्रांती संघटना राज्यातील १२ जागांसाठी आग्रही आहे. सातारा जिल्ह्यातील कºहाड उत्तर, फलटण व माण-खटाव हे तीन मतदारसंघ भाजपकडे मागितले आहेत, असे मत सदाभाऊंनी यावेळी व्यक्त केले.