नेरळमधील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी
By admin | Published: June 10, 2016 03:03 AM2016-06-10T03:03:25+5:302016-06-10T03:03:25+5:30
नागरीकरणामुळे कचऱ्याची समस्या डोके वर काढत असून सध्या असलेल्या डम्पिंग ग्राउंड परिसरात संध्याकाळी जाणे मुश्कील झाले आहे
कर्जत : नेरळमध्ये वाढत्या नागरीकरणामुळे कचऱ्याची समस्या डोके वर काढत असून सध्या असलेल्या डम्पिंग ग्राउंड परिसरात संध्याकाळी जाणे मुश्कील झाले आहे. त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर करून घेतला आहे. खत, कांडी कोळसा, प्लास्टिक क्रश तयार करू शकेल अशा या प्रकल्पासाठी नेरळ विकास प्राधिकरण ९० लाख आणि रायगड जिल्हा परिषद २० लाख असा खर्चाचा भार उचलणार आहे.
आठ टन कचरा दररोज नेरळमधील डम्पिंग ग्राउंडवर जातो. नेरळमधील कचरा डेपो हा लोकवस्तीच्या पश्चिम दिशेला आहे आणि सायंकाळी कचरा डेपोमधील दुर्गंधीचा वास आणि धुराचे लोट लोकवस्तीमध्ये हवेच्या झोकात येत असतात. त्यामुळे अनेकांना श्वसनाचे त्रास होत असल्याची तक्र ार होती. नेरळ विकास प्राधिकरणामध्ये अद्ययावत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प असावा असे सगळ्यांचे म्हणणे होते, ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी नेरळचा कचरा डेपोमध्ये अद्ययावत घनकचरा प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न केले. सध्या असलेल्या डम्पिंग ग्राउंडच्या जागेवर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प साकारत असून त्यासाठी साधारण १ कोटी १०लाखांचा खर्च अपेक्षित आहे. नेरळ विकास प्राधिकरणाला जिल्हा परिषद आर्थिक मदत करणार आहे. या प्रकल्पाचे कन्सल्टन्सी म्हणून लार्ज ग्रुप इंडिया लिमिटेड मदत करीत असून एलएएचएस ग्रीनली लेस कंपनी मशिनरी पुरविणार आहे.
नेरळ ग्रामपंचायतीच्या चार वाहनांच्या माध्यमातून दररोज आठ टन कचरा नेरळ गावातून डम्पिंग ग्राउंडवर जात असतो. त्यातील साडेतीन टन ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यात येणार असून त्या कचऱ्याचे विघटन करून खतामध्ये रूपांतर केले जाणार आहे. डम्पिंग ग्राउंडमध्ये दोन टन कंपोस्ट कचरा येत असतो, त्यात झाडांच्या फांद्या, करवंटी, उसाचा चोथा, पालापाचोळा, या कचऱ्यावर प्रक्रि या करून एक टन कांडी कोळसा दररोज तयार होणार आहे. प्लास्टिक
क्र श, बॅग, अशा वस्तू डम्पिंग ग्राउंडवर येतात. त्यावर प्रक्रि या करून रस्त्याच्या बांधकामासाठी वापरले जाणारे प्लास्टिक क्र श जे डांबरामध्ये वापरले जाते ते तयार केले जाणार आहे. सायंटिफिक वेस्टेज जमिनीवर टाकले की जमीन नापीक होते, त्या कचऱ्याचे विघटन करून खतनिर्मिती केली जाणार आहे. (वार्ताहर)
असा हा बहुउपयोगी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प भविष्यात अनेक शाळा, कॉलेज, तसेच अशा विषयांचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांच्यासाठी अभ्यासाचे ठिकाण झाले पाहिजे. नेरळच्या डम्पिंग ग्राउंडमुळे सध्या निर्माण होत असलेली दुर्गंधी आणि धुराचा त्रास प्रकल्प उभा राहिल्यानंतर होणार नाही.
- सुरेश टोकरे, अध्यक्ष,रायगड जिल्हा परिषद
प्रकल्प साकारत असताना तेथे दररोज ग्रामपंचायतीचे आठ कामगार लागणार असून आमचे दोन कामगार सर्व कर्मचाऱ्यांना सहा महिने प्रशिक्षण देण्याचे काम करतील.
- किशोर परब,
एलएएचएस ग्रीन इंडिया लिमिटेड