समाधान, तल्लीनता
By admin | Published: July 26, 2015 02:51 AM2015-07-26T02:51:28+5:302015-07-26T02:51:28+5:30
मराठी माणसाच्या मनाच्या गाभाऱ्यात विठ्ठलाला एक विशिष्टपूर्ण महत्त्वाचे स्थान आहे. त्याला वारीचे आकर्षण आहे. टाळ विठ्ठल, नाद विठ्ठल... विठ्ठलचि अवघ्या चराचरी...
- विमल मधुसूदन खाचण
मराठी माणसाच्या मनाच्या गाभाऱ्यात विठ्ठलाला एक विशिष्टपूर्ण महत्त्वाचे स्थान आहे. त्याला वारीचे आकर्षण आहे. टाळ विठ्ठल, नाद विठ्ठल... विठ्ठलचि अवघ्या चराचरी... ही भावना असलेला वारकरी पिढ्यान् पिढ्या पंढरीच्या वाटेवर चालतो. सावळ्या विठ्ठलाची अनोखी भक्ती त्याला आपोआपच वारीच्या वाटेवर घेऊन येते आणि चैतन्याची अनुभूती देते. वारी म्हणजे विशिष्ट दिवशी नियमाने पंढरपूरला जाणे. ज्ञानेश्वरीत वारी हा शब्द निरनिराळ्या संदर्भात आलेला आहे. उदा. ‘तरी संकल्पांची सरे वारी’, ‘सरे अहंकाराची वारी, सारितसे वारी संसाराची’, ‘आता कर्मठा कैची वारी, मग रात्रीची वारी उरे।’ या ठिकाणी वारी म्हणजे फेरा. ज्ञानदेवरायांनी वारकऱ्यांचे वर्णन या एका अभंगात केले आहे.
‘काया वाचा मने जीवे सर्वस्व उदार।
बाप रखुमादेवीवरा विठ्ठलाचा वारीकर।।
अनेक कुटुंबांमध्ये वारी परंपरेनेच असते. एखादी वारी चुकली की ते शल्य वर्षभर मनाला बोचते. त्यामुळे शक्यतो वारी चुकविली जात नाही. हे शल्य असते चैतन्याच्या अनुभूतीपासून मुकल्याचे. हेच चैतन्य त्याला त्याच्या दैनंदिन कामकाजाचे बळ देते. म्हणूनच वारकऱ्यांची वारी ही निखळ भक्तीची असते. मात्र, समाधानासाठी, उत्सुकतेसाठी अन् आरोग्यासाठीही वारी करणारा एक वर्ग वारीच्या वाटेवर पाहायला मिळतो. नामदेव महाराजांनी म्हटले आहे की -
आले आले रे हरीचे डिंगर
वीर वारीकर पंढरीचे
नामदेवांची अभंगवाणी हा त्यांच्यातील आर्त भक्तीचा प्रासादिक उद्गार आहे. नामदेवाने एकीकडे भगवद्भक्तीचा गजर घडविला, तर दुसरीकडे प्रबोधनाचा जागर, साहित्य, तत्त्व, विचार, भाषा रसाळता, भावत्कंटता, डोळस भक्ती या साऱ्या गुणांनी नामदेवांची अभंगवाणी लोकधनाच्या पदवीला जाऊन बसली. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी भगवत धर्माचा पाया घातला...
नाचू कीर्तनाचे रंगी।
ज्ञानदीप लावू लगी।।
नामदेव म्हणतात, नाम हाच वेद आहे. नाव हेच ज्ञान आहे. वेद म्हणजे परमात्म्याचे ज्ञान, पण ते ज्ञान नामानेच प्राप्त होते, म्हणून नामचिंतन हा सर्वश्रेष्ठ नामवेद आहे.
नामा महिमा नेणेचि पै ब्रह्मा
म्हणोनिया कर्मा अनुसरला।
नाम हेचि कर्म नाम हेचि धर्म।
केशव हेचि वर्म सांगितले।
नरहरी सोनार वारीला महापर्व म्हणतात. या पर्वात होणारा आनंदांचा काला उपभोगताना ते म्हणतात -
पंढरीनगरी दैवत श्रीहरी
जाती वारकरी व्रतनेमे
आषाढी कार्तिकी महापर्व थोर
भजनाचा गजर करिता तेथे
‘जात पंढरीशी सुख वाटे जीवा। आनंदे केशवा भेटताची,’ असा वारीचा आनंद सेना न्हावी यांनी वर्णन केला आहे. सर्व वारकऱ्यांच्या भेटीमुळे होणारा आनंद वर्णिताना चोखोबा म्हणतात -
पंढरीचा हटा कडलाजी पेठ
मिळले चतुष्ट। वारकरी
वारीत गेले अनेक शतके चाललेली ही परंपरा आजही आपले मूळ स्वरूप, गाभा टिकवून आहे. भौतिक स्तरावर झालेल्या बदलाचे पडसाद पालखी सोहळ्यात उमटले; पण मूळ जीवनदृष्टी कायम आहे. सर्व जातींना एकत्रित घेऊन जाणारा हा सोहळा असे त्याचे स्वरूप आहे. आज कायद्याने समानता असली, तरी हे जातीभेद संपले आहेत असे नाही. आजचे राजकारण हे जातीच्या भोवती फिरत आहे. त्यामुळे वारीची आवश्यकता होती व आहे. पारमार्थिक पातळीवर सर्व जातींना समान न्याय देण्याचे काम वारीने केले आहे. त्यामुळे आजच्या सामाजिक व्यवस्थेतही वारीची उपयुक्तता टिकून आहे. परंपरेनेच बनलेले वारकरी या सोहळ्यात सहभागी होत असतात. पूर्वीच्या काळी शेतकरी बहुसंख्येने सहभागी होत होते. पुढे व्यवसायाची, नोकरीची साधने विस्तारली. त्यामुळे इतर व्यवसायांतील, नोकरीतील व्यक्ती या सोहळ्यात आता सहभागी झाल्या आहेत, म्हणूनच पालखी सोहळ्याचा विस्तार होत आहे.
उन्हापावसाच्या तडाख्यात वारकऱ्यांची पावले झपझप पुढे पडत असताना एक स्त्री वारकरी रस्त्यालगतच्या आंब्याच्या गर्द सावलीच्या झाडाखाली खोडाला पाठ टेकवून निवांत बसली होती. झाडाखालची काळी माती हातात घेऊन वाऱ्यासंगे उडवित होती. आनंदी चेहऱ्याने तिचा हा खेळ रंगला होता. मळलेली साडी, डोक्याला पांढरे पण मळकट कापड बांधलेले. गर्द सावलीच्या ओढीने मी सहज गप्पा मारायला तिच्या जवळ गेली आणि ‘काय माउली, कुठून आली?’ अशी सुरुवात केली. त्यानंतर काही वेळ गप्पा रंगल्या. तिच्याशी बोलून झाल्यावर मी अवाक् झाले. ती बाई एका उद्योजकाची बायको अन् स्वत: उद्योजिका होती. ‘भक्तीतलं मला काही कळत नाही. पण वारीच्या वाटेवर आलं, की समाधान मिळतं. सर्व व्यवहाराची जबाबदारी दुसऱ्याकडे सोपवून, अगदी मोबाइल बंद ठेवून मी वारीमध्ये येते. वर्षभराची एनर्जी व समाधान घेऊन जाते, असे सांगून ती उठली अन् वारीच्या वाटेवर चालू लागली.
केवळ समाधान मिळतं म्हणून अशा प्रकारे वारी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पालखी सोहळ्याची सुरुवात होऊन अनेक शतके उलटली, वारकरी किंवा पालखी मार्गावर येणारी गावे वगळता हा सोहळा नेमका असतो कसा, हे अनेकांना माहीत नव्हतं. कुणीतरी त्याबाबत केवळ वाचलेलं असतं. मात्र, मागील काही वर्षांपासून माध्यमांमध्ये वारी व पालखी सोहळ्याबाबत सविस्तर चित्रण येऊ लागले. वृत्तवाहिन्यांच्या आजच्या जमान्यात त्याचे थेट प्रक्षेपणही होऊ लागले. त्यामुळे हा सोवळा नेमका कसा असतो, भक्तीतील तल्लीनता कशी असते, हे जाणून घेण्यासाठी अनेक जण वारीत सहभागी होतात आणि त्याचा भाग होतात. काही जण काही टप्प्यांपर्यंत तर काही वारीची पूर्ण अनुभूती घेतात.
भल्या पहाटे उठून वेळेत आवरणे अन् उजाडू लागताच पंढरीची वाट धरणे, हा वारकऱ्यांचा वारीतील नित्यक्रम आहे. मात्र, त्यात आरोग्याचाही मंत्र आहे. ‘डॉक्टरांनी सांगितलंय जरा चालत जा,’ असे वाक्य अनेकांकडून आपल्याला ऐकायला मिळते. चालण्याच्या या उपक्रमाला प्रारंभ करण्यास वारीसारखे दुसरे उत्तम माध्यम नाही, असे ठरवून अनेक जण वारीत काही टप्प्यांपर्यंत सहभागी होतात. टाळ मृदंगाच्या नादात, भजनांच्या गायनात, विविध नाचांच्या तालात समाधीस्थ होणं, माणसांनी माणसांमध्ये माणसांसारखं मिसळून विरघळून जाणं. स्वाभिमान आणि जाती विसरून एकेकानं लोटांगणी जाणं या सगळ्यातच वारकऱ्यांना विठ्ठलदर्शन घडत असतं. त्यामुळे लाखोंच्या घरात वारकरी आणि भक्त जसे विठ्ठलमाउलीच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहतात तसेच लाखोंच्या घरात केवळ कळसाच्या दर्शनावरही समाधान मानतात. खरं दर्शन गावापासून निघून हजारो स्त्री-पुरुषांच्या जनसागराचा भाग होत स्वत:ला विसरून जाण्यातूनच घडलेलं असतं, म्हणूनच पंढरीची विठूमाउली गोरगरीब जनतेची माउली आहे. गोरगरीब जनता तिच्यावर प्रेम करते, रागावते, तिला सुनवते, तिच्यावर रुसते, तिला अरे तुरे बोलते. पाषाणालाही पाझर फोडण्याची प्रेमाची शक्ती या सामूहिक अस्तित्वात निर्माण होते. शेकडो वर्षांच्या वारकरी संतांच्या परंपरेने त्यांच्या अभंग ओव्यांनीच हे शक्य केलं आहे. अशी कुवत निर्माण होणाऱ्यांमध्ये पुरुषांबरोबर स्त्रियाही असतात, ही विशेष बाब आहे. ज्ञानाच्या देवाण-घेवाणीचा हा उत्सव असतो. वेगवेगळ्या भौगोलिक क्षेत्रातून तिथल्या सामाजिक, सांस्कृतिक, भाषक परंपरा घेऊन येणाऱ्या मंडळीची सहप्रवासात होणारी भेट म्हणजे या क्षेत्रातल्या विविधतेचा नवा परिचय असतो. तोही एक ज्ञानोत्सव असतो. ही सर्व प्रक्रिया म्हणजे विठूमाउलीची भेट असते. कारण वारकऱ्यांच्या लेखी सर्व जण विठ्ठलमय झालेलेच असतात.