'तुमचे भोंगे थांबवा, आमचे प्रश्न सोडवा!', मंत्रालयासमोर शेतकऱ्यांच्या वेदनांची महाआरती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 05:13 AM2022-05-05T05:13:20+5:302022-05-05T05:14:06+5:30
शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचा हा एक डावच बनला आहे, असा आरोप करत बुधवारी शेतकऱ्यांनी मंत्रालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आपल्या वेदनांची महाआरती केली.
मुंबई : राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक राजकीय भोंगे वाजविण्यात गुंतले आहेत. शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचा हा एक डावच बनला आहे, असा आरोप करत बुधवारी शेतकऱ्यांनी मंत्रालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आपल्या वेदनांची महाआरती केली. तसेच, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांसह प्रमुख राजकीय नेत्यांच्या नावाने धान्य, फळे आणि मिठाची टोकरी पाठवली. शेतकरी धान्यच देऊ शकतो, त्याला तरी जागा आणि तुमचे राजकीय भोंगे थांबवून आमचे प्रश्न सोडवा, अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली.
दुपारी महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या शेतकऱ्यांच्या पथकाने मंत्रालयाच्या प्रवेशद्वारापासून महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत शांती मार्च काढला. यात बळीराजा शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी वारकरी संघटनांसह विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी होते. गांधीजींच्या पुतळ्यासमोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्या नावाची धान्याची टोकरी गांधी पुतळ्याच्या पायरीवर ठेवण्यात आली. तसेच, प्रार्थनासभेतून राजकीय नेत्यांना सद्बुद्धी मिळो आणि शेतकरी समस्यांकडे त्यांचे लक्ष जावो, अशी प्रार्थना करण्यात आली. या प्रार्थना सभेनंतर पोलिसांनी शेतकरी पथकाला ताब्यात घेत मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात नेले. नंतर त्यांची सुटका करण्यात आली.
महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर शेतकरी चालीसा म्हटली
आज सगळीकडे महाआरती करण्याचा घाट घातला गेला आहे. त्यामुळे शेतकरी वेदनांच्या महाआरतीसाठी आम्ही मुंबईत आलो. राज्यातील सरकार ईडी आणि सीबीआयमध्ये अडकले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलायला कोणीच तयार नाही. जातीयवादी नेत्यांच्या तोंडाचे भोंगे बंद करण्यात आणि हिंदुत्वाचे रक्षण करण्यात सरकार गुंतले आहे. राज्यात विजेचा, उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्याबद्दल राजकीय नेत्यांपासून समाजातील नेतेही मौन बाळगून आहेत. त्यामुळे आज आम्ही महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर शेतकरी चालीसा म्हटली.
- विनायक पाटील, उस्मानाबाद
शेतकऱ्यांचे आणि सामान्यांचे प्रश्न आणि वेदना वेगळ्या आहेत. तुमचे राजकीय भोंगे थांबवा. शेतकरी आत्महत्या, भ्रष्टाचार थांबवा, तरुणांच्या प्रश्नांकडे बघा. पण, या सगळ्यांकडे दुर्लक्ष व्हावे यासाठीच सत्ताधारी आणि विरोधकांनी भोंग्यांचा डाव रचला आहे.
- माणिक कदम, परभणी