प्रश्न सोडवा, बडगे दाखवू नका; उद्धव ठाकरेंचा सरकारवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 08:07 PM2018-08-08T20:07:33+5:302018-08-08T20:10:27+5:30
महाराष्ट्रात सध्या शेतकऱ्यांपासून सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत सगळेच आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यापेक्षा त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केली.
मुंबई : महाराष्ट्रात सध्या शेतकऱ्यांपासून सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत सगळेच आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यापेक्षा त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केली.
सातव्या वेतन आयोगाबरोबरच इतर अनेक मागण्यांसाठी सरकारी कर्मचारी सोमवारपासून संपावर गेले आहेत. आधीच मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी आणि शेतकऱ्यांचे त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलने सुरू आहेत. त्यात आता राज्य सरकारी कर्मचारीही संपावर गेल्याने महाराष्ट्राचे समाजमन अस्वस्थ आहे अशी चिंता व्यक्त करून शिवसेना पक्षप्रमुखांनी पुढे स्पष्ट केले की, ‘‘सर्वच राज्यकर्त्यांच्या निवडणूक जुमलेबाजीचे हे परिणाम आहेत. ‘गरीब हटाव’पासून ‘अच्छे दिन’च्या घोषणा पूर्ण झाल्या असत्या तर लोकांच्या असंतोषाचा असा भडका आज उडाला नसता. सत्तेवर येण्यासाठी ‘थापा’ मारल्या गेल्या, लोकांना फसवले गेले, त्याचेच परिणाम सगळे भोगत आहेत. देश अशा जुमलेबाजीमुळे खड्डय़ात गेला आहे असा घणाघात करून उद्धव ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरले.
उद्धव ठाकरे यांनी पुढे सांगितले की, ‘‘महाराष्ट्रात आज शेतकरी व सरकारी कर्मचारी रस्त्यावर उतरला आहे. त्याला आंदोलन न समजता न्याय्य हक्कांचा लढा मानायला हवा. रोजगार, रोजीरोटी या न्याय्य हक्कांसाठीही लोकांना रस्त्यावर उतरावे लागत असेल तर हा देश भविष्यात नक्की कोणत्या दिशेने जाईल ते सांगता येत नाही, असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यासाठीच या लोकांचे प्रश्न सहानुभूतीने, न्याय्य हक्कांचे म्हणून सोडवायला हवेत.
सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी ही रस्त्यावर उतरलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी रास्तच आहे असे सांगून उद्धव ठाकरे यांनी ठणकावले की, त्यांचा संप चिघळण्याआधीच मिटवा. तुमचे ते कारवाईचे बडगे व दंडुके सध्या लांबच ठेवा. ही सर्व महाराष्ट्राचीच जनता आहे. मंत्रालयात ‘राज्यकर्ते’ हे ‘टेम्पररी’ आहेत. सरकारी कर्मचारी कायम आहेत. म्हणूनच त्यांच्या मागण्यांचा विचार करा आणि तुमच्या जुमलेबाजीस एकदाचा पूर्णविराम द्या. कारण तुमचा तो निवडणूक आयोग आणि न्यायालयही जुमलेबाजीस ‘फटके’ देत आहे, असेही शेवटी उद्धव ठाकरे यांनी सांगितले.