काही उमेदवारांची नावे मतदार यादीतून गायब
By admin | Published: October 26, 2016 01:58 AM2016-10-26T01:58:54+5:302016-10-26T01:58:54+5:30
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणातील काही उमेदवारांचीच नावे मतदार यादीत नसल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
डोंबिवली : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणातील काही उमेदवारांचीच नावे मतदार यादीत नसल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. मात्र, त्यांना मतदानाचा अधिकार देणार असल्याचे महामंडळ आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, उमेदवार फोन करून त्रास देत असल्याने मतदार यादीत अनेक साहित्यिकांचे मोबाइल आणि फोन नंबर टाळण्यात आल्याने त्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्याचे आव्हान उमेदवारांना पेलावे लागणार आहे.
अध्यक्षपद निवडणुकीसाठी साहित्य महामंडळाने मतपत्रिका पाठविण्यास सुरुवात केली आहे. मतदारांची यादीही प्रसिद्ध केली आहे. मात्र अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार जयप्रकाश घुमटकर, मदन कुलकर्णी यांचे आणि त्यांच्या सूचक-अनुमोदकांची नावेच यादीत नसल्याची माहिती घुमटकर यांनी दिली. यादीत नाव समाविष्ट करण्याचा विचार केला जाईल, असे निर्वाचन अधिकाऱ्यांनी त्यांना तोंडी सांगितले असले, तरी ते अद्याप समाविष्ट झालेले नाही. अध्यक्षपदाचे अन्य उमेदवार अक्षयकुमार काळे आणि प्रवीण दवणे यांची नावे मात्र मतदार यादीत आहेत.
साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी म्हणाले, उमेदवार ठरण्याआधी मतदारांची यादी निश्चित केली जाते. त्यामुळे दोन उमेदवारांचे नाव मतदार यादीत नाही. नाव नसले, तरी त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात येईल. त्यांना मतपत्रिका पाठविण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी मकरंद अग्निहोत्री यांनी स्पष्ट केले, मतदार यादीत नाव नसले तरी त्यांना मतदान करता येईल. साहित्य महामंडळाच्या पदाधिकारी उज्ज्वला मेहेंदळे म्हणाल्या, मतदार यादी दरवर्षी अद्ययावत होते. रोटेशन पद्धतीने त्यातील काही मतदार गळतात. काही नव्याने समाविष्ट केले जातात. त्यामुळे नाव जाणीपूर्वक वगळण्याचा प्रश्नच येत नाही. महामंडळाचे अन्य पदाधिकारी प्रकाश पायगुडे म्हणाले, उमेदवाराचे नाव यादीत घेण्याचा अधिकार निवडणूक अधिकाऱ्यांचा असतो. ही निवडणूक प्रक्रिया आहे. यादीत त्यांचे नाव नसले, तरी बिघडत नाही. फार तर त्यांचे स्वत:चे मत मिळणार नाही. (प्रतिनिधी)
मोबाइल आणि फोन नंबरला फाटा
साहित्य महामंडळाने साहित्य संमेलनाच्या निवडणुकीसाठी जी मतदार यादी तयार केली आहे. त्या यादीत केवळ मुंबईतील साहित्यिकांचे मोबाइल व घरचे फोन नंबर आहेत. मुंबई वगळता इतर भागातील साहित्यिकांचे केवळ नाव व पत्ता आहे.
मोबाइल आणि फोन नंबर नमूद केलेले नाहीत. त्यामुळे अध्यक्षपदाच्या उमेदवारांना प्रचारासाठी मुंबई वगळता अन्य भागात प्रत्यक्ष भेटीगाठीवर जास्त भर द्यावा लागेल.
फोन किंवा मोबाइल नंबर दिला, की अध्यक्षपदाच्या उमेदवारांकडून सातत्याने फोन केल्याने मतदारांना सतावले जाते, असा अनुभव मतदारांनी सांगितल्याने महामंडळाने यंदाच्या वर्षी मोबाइल व फोन नंबरऐवजी नाव-पत्ता दिला आहे.