पानसरेंवरील हल्लामागच्या काही शक्यता

By admin | Published: February 16, 2015 11:19 PM2015-02-16T23:19:10+5:302015-02-16T23:19:28+5:30

तुमचा दाभोलकर करू..टोल आंदोलन चुकीचा इतिहास सांगताय...

Some of the chances of attacking Panesar | पानसरेंवरील हल्लामागच्या काही शक्यता

पानसरेंवरील हल्लामागच्या काही शक्यता

Next


कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर या दोघांच्या हल्ल्यांत अनेक साम्य आहेत. त्यामुळे दाभोलकर यांचा खून ज्या शक्तींनी केला त्यांनीच पानसरे यांच्यावर हल्ला केला असण्याची शक्यता ठळकपणे व्यक्त होत आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांतील पानसरे यांच्यासंबंधी घडलेल्या घटनांचा संदर्भ या शक्यतेला पुष्टी देणारा आहे.

तुमचा दाभोलकर करू..
कोल्हापुरात शाहू स्मारक भवनात पानसरे यांच्या पुढाकाराने ‘हू किल्ड करकरे..’ या विषयावर ३० डिसेंबर २०१४ ला निवृत्त पोलीस आयुक्त शमशुद्दीन मुश्रीफ यांचे व्याख्यान झाले. त्या व्याख्यानास कोल्हापुरातील काही हिंदुत्ववाद्यांनी विरोध केला होता. त्यासंबंधीची तक्रार पोलिसांपर्यंतही गेली होती; परंतु पानसरे यांनी कार्यक्रम होणारच, अशी ठाम भूमिका घेतली. या व्याख्यानास लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्या सभागृहाच्या इतिहासात अगदी रस्त्यापर्यंत गर्दी आजपर्यंत कधीच झाली नव्हती. या व्याख्यानात मुश्रीफ, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील व स्वत: पानसरे यांनीही करकरे व दाभोलकर यांची हत्या ही हिंदुत्ववाद्यांनीच केल्याचा जाहीर आरोप केला होता. या व्याख्यानानंतर पानसरे यांना बिंदू चौकातील कम्युनिस्ट पक्ष कार्यालयाच्या पत्त्यावर काही पोस्टकार्ड आली. तशी ही पोस्टकार्डे त्यांना गेल्या काही वर्षांपासून येत होती. त्यात ‘तुमचा दाभोलकर करू...पुरोगामीपणाचा टेंभा जिरविल्याशिवाय राहणार नाही..आमच्या भावना दुखावणारे तुम्ही वारंवार बोलू नका, नाही तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही..’ असा उल्लेख त्यामध्ये शाईच्या पेनाने लिहिलेला होता. या पत्रावर पुणे पोस्टाचा शिक्का होता. त्यातील काही पत्रे पक्षाचे कार्यकर्ते उमेश सूर्यवंशी यांनी अण्णांनाही दाखवली. त्यावर ते हसत असत. अरे उमेश, त्या सनातनवाल्यांनी माझ्यावर दहा कोटींचा दावा ठोकला आहे. ही पत्रेही असेच कोणतरी पाठवित असेल. कशाला त्याची भीती बाळगायची, असे त्यांचे उत्तर असे. ही पत्रे त्यांनीही स्वत:च फाडून टाकली आहेत. त्याची वेळीच दखल घेऊन पोलिसांना सतर्क केले असते तर कदाचित हा हल्ला टाळता आला असता..

चुकीचा इतिहास सांगताय
शिवाजी विद्यापीठातील १५ जानेवारी २०१५ चा प्रसंग. विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेतील मुलांचे शिबिर सुरू होते. त्यास येथील कॉमर्स कॉलेज, नाईट, केएमसी व वडगांवच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयांतील सव्वाशे मुले उपस्थित होती. त्यांच्यासाठी पानसरे यांचे शाहू विचारांची प्रस्तुतता या विषयावर सायंकाळी पाच वाजता शाहू सभागृहात व्याख्यान झाले. व्याख्यान संपत आले असता पानसरे यांनी त्यांच्या पद्धतीप्रमाणे शाहूंच्या विचारांना सद्य:स्थितीचा संदर्भ दिला. ‘महाराष्ट्र हा पुरोगामी आहे असे म्हणणे चुकीचे असल्याचे सांगून त्यांनी सध्या महात्मा गांधींचा अवमान व त्यांचे मारेकरी नथुराम गोडसे यांचा जयजयकार सुरू झाल्याचे सांगितले. हा नथुराम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाच कार्यकर्ता होता व सध्या महाराष्ट्रातही त्याच विचाराचे सरकार आल्याचे सांगितले. पानसरे यांच्या या विधानास सोलापूरहून आलेल्या व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ काम करणाऱ्या गणेश गुरव या कार्यकर्त्याने सभागृहातच विरोध केला. पानसरे, तुम्ही विद्यार्थ्यांना चुकीचा इतिहास सांगता आहात. नथुराम हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कधीच कार्यकर्ता नव्हता. तो हिंदू महासभेचा कार्यकर्ता होता. तुम्ही शिवाजी महाराजांबद्दलही चुकीचा इतिहास मांडत आहात. नथुरामांबद्दल जे बोलता, त्याचे तुमच्याकडे काही पुरावे आहेत का, अशी एकेरीतच विचारणा केली. मी तुमच्याविरोधात खटला दाखल करणार असल्याचेच त्याने पानसरे यांना बजावले. पानसरे यांच्या नातवाच्या वयाचा तो कार्यकर्ता असूनही या दोघांत या विषयांवरून सभागृहातच तू-तू..मंै-मैं..झाले. त्यावर पानसरे यांनीही त्यास ‘तू न्यायालयात केस कर. मीदेखील वकील आहे व मी जे बोललो त्याचे सगळे पुरावे न्यायालयात सादर करतो. तू कधी केस करतोस तेदेखील सांग, असेही पानसरे यांनी त्याला सुनावले. त्यावर त्या कार्यकर्त्याने पाच दिवसांत केस करणार असल्याचे सांगितले होते. तू केस नाही केलीस तर सहाव्या दिवशी मला येऊन भेट..मी तुला सगळे पुरावे देतो, असेही पानसरे यांनी त्यास सांगितले. हा वाद झाल्यावर विद्यापीठाच्या सुरक्षा यंत्रणेने त्यास बाहेर काढले. या प्रकाराबद्दल कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्या प्रा. सुनीता अमृतसागर, सतीश कांबळे आदींनीही विद्यापीठ प्रशासनाकडे त्याची तक्रार केली. त्यावेळी हा कार्यकर्ता विद्यापीठात याच विद्यार्थ्यांसमोर ‘विवेकानंद’ यांच्याविषयी व्याख्यान ठेवा, असे सांगण्यासाठी आल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. आता पोलिसांनी त्याचाही शोध सुरू केला आहे. या घटनेचे काहीजणांनी रेकॉर्डिंगही केले असून ते उपलब्ध आहे.

टोल आंदोलन
कोल्हापुरातील गेली चार वर्षे सुरू असलेल्या टोलविरोधी आंदोलनाचे गोविंद पानसरे हे बिनीचे शिलेदार. किंबहुना पानसरे व ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, निवासराव साळोखे यांच्यामुळेच हे आंदोलन आजही तितक्याच हिंमतीने सुरू आहे. या आंदोलनास एन. डी. पाटील-पानसरे यांच्या नेतृत्वामुळे नैतिक बळ मिळाले. सततच्या आंदोलनामुळे कोल्हापुरातील टोल रद्द होण्याची शक्यता तयार झाली आहे. त्या रागातून पानसरे यांच्यावर हल्ला झाल्याची शक्यता सर्वप्रथम व्यक्त झाली. सोशल मीडियावरही तसे मेसेजेस फिरले; परंतु त्यात तथ्य असण्याची शक्यता फार कमी वाटते. कारण जरी पानसरे यांनी या आंदोलनात हिरिरीने भाग घेतला असला तरी कोल्हापुरात सध्या टोलवसुली सुरूच आहे. राज्य शासनाने त्यासंबंधीचा निर्णय घेण्यासाठी मूल्यांकन समिती नियुक्त केली आहे. त्यामुळे या प्रश्नांतील यापूर्वीची दाहकता कमी झाली आहे.

Web Title: Some of the chances of attacking Panesar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.