मराठवाडा वॉटरग्रीडमध्ये काही धोके - कोहीरकर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 09:07 AM2021-11-29T09:07:55+5:302021-11-29T09:08:22+5:30
Marathwada Watergrid: मराठवाडा वॉटरग्रीड योजनेबाबत निर्णय घेता येईल, परंतु त्याचे काही धोके आहेत, असे मत जलसंपदा खात्याचे मावळते सचिव अजय कोहीरकर यांनी रविवारी व्यक्त केले.
औरंगाबाद : मराठवाडा वॉटरग्रीड योजनेबाबत निर्णय घेता येईल, परंतु त्याचे काही धोके आहेत, असे मत जलसंपदा खात्याचे मावळते
सचिव अजय कोहीरकर यांनी रविवारी व्यक्त केले.
३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कोहीरकर म्हणाले, वॉटरग्रीडमध्ये काही धोके आहेत. त्या योजनेत शेती, उद्योग, पिण्यासाठी पाणी देण्याचे नियोजन आहे. विभागात ११ ते १२ मोठी धरणे आहेत. ती एकमेकांना जोडण्याची ही योजना आहे. भविष्यात यातील निम्म्या धरणांत पाणी असेल, तर ते कुठे आणि किती प्रमाणात द्यायचे. त्याचे वाटप होणे अवघड होईल. दरवर्षी ऑक्टोबरमध्ये नियोजन करावे लागेल. नाशिक, अहमदनगरमध्ये धरणे बांधली गेली. मोठ्या प्रमाणात धरणे बांधल्याने त्याचा परिणाम जायकवाडीवर झाला. असेच होत राहिले, तर जिल्ह्या-जिल्ह्यांत भांडणे होतील.
सत्ताधारी मंत्री काय म्हणाले?
रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी जायकवाडीचे कालवे दुरुस्तीची मागणी केली. गोदावरी खोऱ्यातील बंधाऱ्यांना रोटेशनप्रमाणे पाणी देण्यासह जायकवाडीवरील २ लाख हेक्टरऐवजी अवघी ८० हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येत असल्याचे सांगितले. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड-सोयगावमधील प्रकल्प मार्गी लावून मराठवाड्यातील सिंचनासाठी चर्चासत्र घेण्याचा प्रस्ताव मांडला. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, मराठवाड्यात ४ लाख ७९ हजार सिंचनाचा ५,३३२ कोटींचा अनुशेष आहे. कायम अनुशेष असलेल्या जिल्ह्यांत जालना, औरंगाबाद आहेत. त्यासाठी पैसे मिळाले तर कामे होतील. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, मराठवाडा १६१ टीएमसी पाण्याची तूट असलेले खोरे आहे. पैनगंगा, मध्य गोदावरी उपखोऱ्यातून तूट भरून काढण्यास सुरुवात झाली आहे. सध्या धरणे भरलेली आहेत, परंतु पुन्हा दुष्काळ आला तर यासाठी जेवढी धरणे आहेत, त्यात कुठूनही आणा, मात्र पाणी द्या. तसे केले तरच पश्चिम महाराष्ट्राची बरोबरी मराठवाडा करेल.