Uddhav Thackeray: काही आजोबा बोलत आहेत, उद्धव ठाकरेंचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना अप्रत्यक्ष टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 09:28 PM2022-11-20T21:28:58+5:302022-11-20T21:29:31+5:30
वंचित समाजाला उभे करण्याचे काम बाबासाहेबांनी केले. स्वातंत्र अबाधित राखण्यासाठी जे जे सोबत येतील त्यांच्यासोबत आम्ही जाणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
प्रबोधनकार ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे आम्ही दोघांचे नातू इथे बोलत आहोत. काही आजोबा बोलत आहेत. मग वाट दाखविणाऱ्यांना आदर्श मानायचे की वाट लावणाऱ्यांना मानायचे, हा प्रश्न पडला आहे, असा खोचक टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना नाव न घेता लगावला.
प्रबोधन ठाकरे यांच्या स्मृतिदिनी पुस्तक, ग्रंथ, लेख आदींच्या वेबसाईटचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
वंचित समाजाला उभे करण्याचे काम बाबासाहेबांनी केले. स्वातंत्र अबाधित राखण्यासाठी जे जे सोबत येतील त्यांच्यासोबत आम्ही जाणार. माणुसकी हाच खरा धर्म. घटनेचा उल्लेख केला जातो. त्यात राज्य आणि केंद्राला समान अधिकार दिल्याचे ते म्हणाले होते. दोन तीन बाबी सोडल्या तर हे अधिकार राज्यांनाही दिले आहेत. परंतू ते आज दिसत नाहीत. वाटेल त्या मार्गाने सत्ता पाहिजे, ही माणसे लायक नाहीत. ह्यांना खाली पाय ओढून खेचले पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.
देशाचा कायदा मंत्री न्यायव्यवस्थेविरोधात वक्तव्य करतो. न्यायव्यवस्था संपली आहे, पंतप्रधानांनी यापुढे न्यायाधीश नेमावेत असे भासवण्यासाठी हे केले जात आहे. मग लोकांचा विश्वास असलेली न्यायालयेच बंद करा. माझ्यावरही उद्या खटला दाखल होईल. मग किरण रिजिजू यांच्यावर का नाही? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी आपले कोणत्या धर्माशी भांडण नव्हते, धर्मांनी सांगितलेल्या सामजिक व्यवस्थेशी भांडण आहे. जात या नावाचा सुद्धा एक देश आहे हे लक्षात घ्या. आपण ज्यावेळेस प्रबोधनकार वाचायला घेऊ तेव्हा कळेल की जात कशी ओढलेली आहे. आणि मग समता कशी येईल हे कळते, असे आंबेडकर म्हणाले. संस्कृती आणि भाषे मुळे समता येते असे ते म्हणाले.
एकदा क्षत्रिय हरला कि उरलेले सगळे हरले. कारण शस्त्र घेण्याची पद्धत नव्हती याला छत्रपती शिवाजी महाराज अपवाद ठरले. आपण पहिल्या सेन्सस नंतर हिंदुत्व हा शब्द वापरायला लागलो. आपण समता आणि बंधुभाव या दोघांचा बळी दिला आहे. एक बाजूला दडपशाहीचे वातावरण वाढले आहे. दडपशाही जर बघायची असेल तर आपण मुस्लिमांना पहा म्हणतो. वैदिक धर्मात तरी कुठे लोकशाही आहे, तिकडे सुद्धा हुकूमशाही आहे, असे आंबेडकर म्हणाले.