कुठे उष्णतेच्या लाटा तर कुठे अवकाळीचा फेरा; विदर्भात उष्णतेची लाट येणार
By सचिन लुंगसे | Published: May 28, 2024 07:41 PM2024-05-28T19:41:38+5:302024-05-28T19:42:09+5:30
राज्याच्या काही भागात उष्णतेची लाट तर काही भागात अवकाळी पावसाचा मारा असे हवामान आहे.
मुंबई : मुंबईसह राज्यभरातील हवामानात उल्लेखनीय बदल नोंदविण्यात येत असून, उर्वरित राज्याच्या तुलनेत विदर्भात कमाल तापमानाचा पारा अधिक नोंदविण्यात आहे. विशेषत: जळगाव आणि यवतमाळसह लगतच्या जिल्हयांत पारा ४५ अंशावर गेला असून, बुधवारी विदर्भातील जिल्हयांत तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
राज्याच्या काही भागात उष्णतेची लाट तर काही भागात अवकाळी पावसाचा मारा असे हवामान आहे. पश्चिम महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील काही जिल्हयांना अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. सोलापूरसह लगतच्या जिल्हयांत सायंकाळी दाटून येणा-या ढगांसोबत विजांचा कडकडाट होत असून, वादळी वा-यासोबत पावासाच्या सरी कोसळत आहेत.
बुधवारी मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २९ च्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
कुठे किती पारा
अहमदनगर ३६.२
छत्रपती संभाजी नगर ४२
बीड ४१.५
जळगाव ४२
मालेगाव ४२.८
मुंबई ३४.६
नांदेड ४२.६
नंदुरबार ३९.४
धाराशीव ३८.५
परभणी ४३.२
सोलापूर ३७.८
ठाणे ३६.२