राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या नेत्यांबद्दल शरद पवार म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 04:02 PM2019-09-15T16:02:23+5:302019-09-15T16:06:38+5:30
राष्ट्रवादी सोडणाऱ्या नेत्यांवर शरद पवारांचं भाष्य
नवी मुंबई : महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुकांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून सत्ताधारी पक्षाकडून वेगळ्या पद्धतीने कामे करण्याची सुरुवात झाली आहे. अडचणी आल्या तर त्यांना सामोरे गेले पाहिजे. परंतु काही लोक सत्तेसाठी पक्ष बदलतात, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षांतर करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना लगावला. ते नवी मुंबईत बोलत होते.
विरोधी पक्षात बसून जास्त कामे करता येत असल्याचे सांगत देशात महागाई, बेरोजगारीसारखे अनेक प्रश्न निर्माण झाले असून सध्याचे केंद्रातील आणि राज्यातील सरकार अपयशी ठरले असल्याची टीका पवार यांनी केली. माजी मंत्री गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशानंतर शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधे उत्साह निर्माण व्हावा यासाठी जिलाध्यक्ष अशोक गावडे यांनी आज नेरूळमध्ये कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या प्रसंगी पवार बोलत होते. या मेळाव्याला प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, माथाडी नेते शशिकांत शिंदे, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.