लढाईपूर्वीच काहींनी सोडले होते मैदान नारायण राणेंचा आरोप
By admin | Published: November 5, 2014 04:46 AM2014-11-05T04:46:49+5:302014-11-05T04:46:49+5:30
काही काँग्रेस नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधीच मैदान सोडून दिले होते. त्यांनी काम करणेही बंद केले होते. पराभूत मानसिकतेत अनेक जण होते
मुंबई : काही काँग्रेस नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधीच मैदान सोडून दिले होते. त्यांनी काम करणेही बंद केले होते. पराभूत मानसिकतेत अनेक जण होते, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज केला. राणे यांनी नावे सांगण्यास नकार दिला; पण काँग्रेस श्रेष्ठींना अहवाल पाठवू, असे ते म्हणाले.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राणे आज पहिल्यांदाच गांधी भवनात आले होते. या वेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या भावनांना वाट करून दिली. काँग्रेस उमेदवारांना पुरविण्यासाठी आलेल्या रकमेपैकी १० कोटींची चोरी झाल्याच्या वृत्ताबाबत माहिती नाही, असे सांगत उमेदवारांना पैसे पोहोचविण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर होती, असा सूचक इशाराही त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केला. उमेदवारांना पक्षातर्फे पुरेसा निधी का पोहोचला नाही, साधनसामुग्री का पुरविली गेली नाही आणि नीट प्रचारसभादेखील का देण्यात आल्या नाहीत, याची चौकशी काँग्रेस श्रेष्ठींनी करावी आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी राणे यांनी केली.
काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक ६ नोव्हेंबरला होणार आहे. सध्या चर्चेतील एकाही नेत्याला काँग्रेसचा नेता म्हणून निवडू नये, असे सांगत राणेंनी एकप्रकारे पृथ्वीराज चव्हाण यांनाच लक्ष्य केले. आघाडी तुटली तेव्हाच दोन्ही पक्षांचा पराभव आपल्याला दिसला होता, असेही ते म्हणाले. प्रचार समितीचा प्रमुख म्हणून पराभवाची नैतिक जबाबदारी आपलीही आहे, असे ते म्हणाले.