"काही लोकांना बांबू लावला पाहिजे’’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांचं नाव न घेता टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 06:56 PM2024-06-23T18:56:04+5:302024-06-23T18:57:16+5:30
Eknath Shinde Criticize Sanjay Raut: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत हे शिवसेना शिंदे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने परखड शब्दात टीका करत असतात. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एका कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत हे शिवसेना शिंदे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने परखड शब्दात टीका करत असतात. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एका कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला. या कार्यक्रमामध्ये बांबूचं महत्त्व पटवून देताना मुख्यमंत्र्यांनी काही लोकांना बांबू लावला पाहिजे, असं विधान केलं.
एकनाथ शिंदे म्हणाले की, बांबू हा ऑक्सिजन अधिक देणारा आणि कार्बन डाय ऑक्साइड अधिक प्रमाणात शोषून घेणारा आहे. बांबूचे एवढे बायो प्रॉडक्ट आहेत की आपण विचारही करू शकणार नाही. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड केली पाहिजे. तसेच काही लोकांना बांबूही लावायला पाहिजे. काही असे लोक आहेत की सकाळीच भोंगा वाजतो. एक भोंगा निघालाय तर दुसरा चालू आहे, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.
तत्पूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघावरून आदित्य ठाकरेंवर टीका केली होती. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना काहींनी मतदान केले. त्यामुळे त्यांचा विजय झाला. मात्र ही तात्पुरती गोष्ट असून कामस्वरुपी गोष्ट नाही. लोकांची दिशाभूल करून महाविकास आघाडीने मते मिळवली. वारंवार लोकांची दिशाभूल करता येत नाही. येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील आणि पुन्हा एकदा महायुतीचे सरकार महाराष्ट्रात येईल, असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच आता आदित्य ठाकरे वरळीमधून निवडणुकीला उभे राहतात की नाही? हा एक प्रश्न आहे. की घाबरून दुसरा मतदारसंघ शोधतात, हे पाहावे लागेल, असा टोला श्रीकांत शिंदे यांनी लगावला.