काही सत्ताधारी नेते आर्थिक कमाईसाठी कोरोनाची तिसरी लाट म्हणत भीती निर्माण करतायत : किरीट सोमय्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 01:36 PM2022-01-07T13:36:17+5:302022-01-07T13:36:35+5:30
Coronavirus : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.
Kirit Somaiya On Coronavirus : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. प्रामुख्यानं मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णवाढ मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसून येत आहे. राज्यात गुरूवारी तब्बल ३६ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली. दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मात्र काही सत्ताधारी नेते कोरोनाची तिसऱ्या लाटेची भीती निर्माण केली जात असल्याचा आरोप केला.
"काही सत्ताधारी नेते स्वत:चं राजकीय वजन वाढवण्यासाठी, आर्थिक कमाईसाठी कोरोनाची तिसरी लाट, प्रचंड वाढ, लॉकडाऊन धमक्या देऊन लोकांमध्ये भीती निर्माण करत आहेत. ते त्यांनी थांबवावं. ओमिक्रॉनचे ९५ टक्के रुग्णांना वैद्यकीय उपचाराची गरजच पडत नाहीये. २-४ दिवसांत सगळे बरे होत आहेत. खुप कमी लोक कोमॉर्बिटी आहे, त्यांनी काळजी घ्यायची गरज आहे. घाबरायची गरज नाही," असं किरीट सोमय्या म्हणाले.
देशात दिवसभरात १ लाखांपेक्षा अधिक रुग्ण
कोरोनाच्या ओमायक्रॉन(Omicron) व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा भारतात दहशत पसरली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येमुळे तिसरी लाट धडकण्याचे संकेत मिळत आहेत. मागील २४ तासांत कोरोनाचे १ लाख १७ हजार १०० रुग्ण आढळले. बुधवारच्या तुलनेत तब्बल २८ टक्क्यांनी रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. बुधवारी देशात ९० हजाराहून अधिक कोरोना रुग्ण सापडले होते. भारतात जवळपास ७ महिन्यांनी रुग्णसंख्या १ लाखांच्या वर गेली आहे. त्याआधी ६ जूनला भारतात १ लाखाहून अधिक रुग्ण आढळले होते.