काही वक्तव्ये भुजबळांकडून आली काही माझ्याकडून; शंभुराज देसाईंनी सांगितले कॅबिनेटमध्ये काय घडले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 02:06 PM2023-11-09T14:06:14+5:302023-11-09T14:07:29+5:30
मुख्यमंत्र्यांनी शंभुराज देसाई आणि छगन भुजबळ यांच्यातील वादावर कालच्या बैठकीत कानपिचक्या दिल्याची माहिती समोर आली आहे. राऊतांनी गँगवॉरसारख्या परिस्थितीचे आरोप केले आहेत.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काल दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात, ते जरी सांगितले असते तर बरे झाले असते. कॅबिनेट बैठकीत काही वक्तव्ये माझ्या आणि भुजबळ यांच्याकडून आली. यावर मुख्यमंत्र्यांनी विसंगत वक्तव्ये करु नये असे सांगितले. एकाच सरकारमध्ये विसंगती नको, जे ठरलेले आहे आणि घडलेले आहे तेच बोला. खेळीमेळीत चर्चा झाली, मी आता जे बोललो तेवढेच घडल्याचे मंत्री शंभुराज देसाईंनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी शंभुराज देसाई आणि छगन भुजबळ यांच्यातील वादावर कालच्या बैठकीत कानपिचक्या दिल्याची माहिती समोर आली आहे. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मंत्रिमंडळात गँगवॉरसारखी परिस्थिती असल्याचे म्हटले आहे. शिवाय एक मंत्री दुसऱ्या मंत्र्याच्या अंगावर धावून गेल्याचे म्हटले आहे. यावरून मुश्रीफांनी राऊतांना सिद्ध करण्याचे आव्हान दिलेले असताना शंभुराज देसाई देखील आता समोर आले आहेत.
राऊतांचे खबरे त्यांना अडचणीत आणतील, चार टर्म खासदार असे बोलतो हे आम्हाला आश्चर्य वाटते. राऊत सिद्ध करु शकले तर राजीनामा देऊ असे मुश्रीफ बोलले, मी देखील त्यांच्याशी सहमत आहे. राऊतांना काम करणे नीट जमते, त्यांना तेच काम दिलेले आहे. जे घडले नाही ते भासवले जातेय. राऊतांना महाराष्ट्र गांभीर्याने घेत नाही, असेही देसाई म्हणाले.
गेल्या दीड दोन वर्षात कोणाला त्यांनी चांगले म्हटलेय का? बाकी सगळेच वाईट, विश्वज्ञानी मी एकटाच अशी त्यांची मानसिकता आहे. आयोग, न्यायालये स्वायत्त असतात हे त्यांना कळले पाहिजे, असे देसाई म्हणाले.
गेले वर्षभर आम्ही निवडणुकीची तयारी करत आहोत. माध्यमांसमोर ते बोलायचं नसते. ग्रामपंचायतीत आम्हाला अधिक जागा मिळाल्या आहेत. महाराष्ट्राचा कल कोणत्या बाजूनं आहे हे कळले आहे. कोणी कुठे जावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अडीज वर्ष आम्ही हेच म्हणत होतो, काही ना काही निमित्त का होईना ते बाहेर पडतायत, असा टोला देसाई यांनी उद्धव ठाकरेंच्या मुंब्रा दौऱ्यावर लगावला. याचबरोबर ज्याच्याकडे पक्ष आणि चिन्ह त्यांच्याकडे या शाखा राहतील, असेही देसाई म्हणाले.