'अर्थ खात्याकडून कधी कधी एसटी महामंडळाला वेळेवर पैसे मिळत नाही, त्यामुळे...'; सरनाईकांनी सांगितली अडचण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 09:55 IST2025-04-10T09:54:29+5:302025-04-10T09:55:22+5:30
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अर्थ खात्याकडून एसटी महामंडळाला वेळेवर पैसे मिळत नसल्याचा मुद्दा मांडला. त्यांनी अजित पवारांकडे विनंतीही केली आहे.

'अर्थ खात्याकडून कधी कधी एसटी महामंडळाला वेळेवर पैसे मिळत नाही, त्यामुळे...'; सरनाईकांनी सांगितली अडचण
Ajit Pawar Pratap Sarnaik: राज्य सरकारकडून एसटी प्रवासात सवलत देणाऱ्या अनेक योजना राबवल्या जात आहे. यात महिलांना प्रवासात ५० टक्के सवलत देण्याची महिला सन्मान योजनेचा वाटा मोठा असून, या माध्यमातून एसटी महामंडळाला राज्य सरकारकडून प्रतिपूर्ती म्हणून पैसे दिले जातात. या सवलत योजनांचे पैसे अर्थ खात्याकडून वेळेवर मिळत नसल्याचे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
प्रताप सरनाईक यांनी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एसटी महामंडळाला सरकारकडून वेळेवर पैसे मिळत नसल्याने अडचणी निर्माण होतात, असे सांगितले.
अजित पवारांना सरनाईकांनी केली विनंती
"प्रवासी संख्या आमची वाढली आहे, परंतू जे पैसे आम्हाला शासनाकडून प्रतिपूर्तीच्या माध्यमातून मिळतात. ते पैसे जर वेळेवर मिळाले तर आम्ही नफ्यात जाऊ. कधी कधी ते पैसे अर्थ खात्याकडून वेळेवर मिळत नाही. त्यामुळे कधी कधी अडचणी निर्माण होतात. मी अर्थ खात्याचे प्रमुख अजित पवारांना विनंती केली आहे की, आम्हाला अर्थ खात्यातर्फे योग्य सहकार्य मिळालं पाहिजे", असे प्रताप सरनाईक म्हणाले.
पालघर शिवसेनेचाच बालेकिल्ला
पालघर जिल्ह्यातील जनता दरबाराबद्दल बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले, "नाईकांचा दरबार, सरनाईकांचा दरबार अशा प्रकारच्या बातम्या आल्या आहेत. हे बरोबर नाही. शेवटी महायुतीच्या सरकारमध्ये जबाबदारी आम्हाला दिलेली आहे. बहुमत आम्हाला दिलेलं आहे. ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आम्हाला कामं करायची आहेत, त्या जिल्ह्यात आम्ही पोहोचतो."
वाचा >तिसरी चूक झाल्यास मंत्रिपद जाईल; वादग्रस्त विधाने करणाऱ्यांना अजित पवारांचा इशारा
"पालघर जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पालघर जिल्ह्यावर आनंद दिघेंचं विशेष प्रेम होतं. त्यांनी रात्री-बेरात्री फिरून संघटना रूजवली. पालघरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेही विशेष प्रेम होतं. पक्षाचे नेते एकनाथ शिंदेंनी या जिल्ह्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत. शिवसैनिक कामाला लागले आहेत", असे सरनाईक माध्यमांशी बोलताना म्हणाले.