कहीं खुशी कहीं गम!
By Admin | Published: November 19, 2016 03:52 AM2016-11-19T03:52:38+5:302016-11-19T03:52:38+5:30
पाचशे आणि हजारांच्या नोटांवर घातलेल्या निर्बंधामुळे नागरिकांची परवड होत आहे.
डोंबिवली : पाचशे आणि हजारांच्या नोटांवर घातलेल्या निर्बंधामुळे नागरिकांची परवड होत आहे. त्यात आता बँकांमधून केवळ दोन हजार रुपये मिळत आहेत. त्यामुळे काहीशी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे काहींनी स्वागत केले आहे. यामुळे सगळ्यांनाच पैसे मिळतील, अशी भावनाही ते व्यक्त करत आहेत. कालबाह्य झालेल्या नोटा २४ नोव्हेंबरपर्यंत स्वीकारण्याची मुदत असतानाही आजही काही ठिकाणी त्या सर्रासपणे नाकारल्या जात असल्याचे चित्रही पाहावयास मिळत आहे.
नोटाबंदीचा सर्वात जास्त फटका भाजीविक्रेत्यांना बसला आहे. घाऊक व्यापारी आणि किरकोळ विक्रेते यांच्यात वारंवार खटके उडत आहेत. भाजीपाला विक्रीविना तसाच पडून राहत असल्याने सडत आहे. ग्राहकांनीही पाठ फिरवल्याने धंद्यावर मोठा परिणाम झाल्याचे भाजीविक्रेते सुदाम कुलवडे यांनी सांगितले. दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे विक्रे ते डी.जे. पुरोहित यांनी मात्र बदललेल्या नियमाचे स्वागत केले आहे. यामुळे सर्वांनाच पैसे मिळतील. त्यातच पैसे काढणाऱ्यांच्या बोटांवर शाई लावण्याचा निर्णय घेतल्याने काळा पैसा पांढरा करण्याच्या प्रक्रियेला आळा बसेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
रिक्षाचालक वासुदेव म्हसकर यांनीही नियमबदलाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. यामुळे भ्रष्टाचाराला खऱ्या अर्थाने चाप बसेल. मात्र, नोटांचा वापर करण्यास सरकारने मुदत वाढवली असलीतरी काही पेट्रोलपंपांवर त्या नोटा स्वीकारल्या जात नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रथम साडेचार हजारांपर्यंत नोटा बदलून मिळत होत्या. आता बदलाची मर्यादा दोन हजारांपर्यंत आणली आहे. आधीच बँकांना पैशांचा पुरवठा कमी प्रमाणात होत असताना घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे सर्वांनाच पैसे मिळतील, अशी आशा गृहिणी राजश्री खोत यांनी व्यक्त केली. दरम्यान, राष्ट्रीय बँका वगळता अन्य बँकांना रिझर्व्ह बँकेकडून योग्य त्या प्रमाणात पैशांचा पुरवठा केला जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही बँकांच्या बाहेरची गर्दीही काही प्रमाणात रोडावली आहे. पैसाच नसल्याने काही बँकांची एटीएम मशीन बंद आहेत. त्यामुळे काही खातेदारांचा पैसे भरण्याकडेच कल दिसत आहे. (प्रतिनिधी)
>परिस्थिती स्थिरावेल
पुढील आठवड्यापर्यंत उद्भवलेली परिस्थिती स्थिर होईल, अशी आशा नागरिकांना आहे.
>क्रेडिट, डेबिटकार्डचा वापर वाढला
नोटा स्वीकारण्यास नकार दिला जात असल्याने मोठ्या स्टोअर्समध्ये तसेच पेट्रोलपंपांवर क्रेडिट आणि डेबिटकार्डचा वापर ग्राहकांकडून होत आहे.