सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कोठडीतील मृत्यू अमानुष मारहाणीमुळेच, सुषमा अंधारेंचा आरोप

By नरेश डोंगरे | Updated: December 16, 2024 20:29 IST2024-12-16T20:28:35+5:302024-12-16T20:29:18+5:30

Somnath Suryavanshi Death News: सूर्यवंशीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर तातडीने गुन्हा दाखल करा, अन्यथा आपण स्वत: परभणीत जाऊन आंदोलन करू, असा ईशारा शिवसेना उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिला.

Somnath Suryavanshi's death in police custody was due to inhuman beating, alleges Sushma Andhare | सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कोठडीतील मृत्यू अमानुष मारहाणीमुळेच, सुषमा अंधारेंचा आरोप

सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कोठडीतील मृत्यू अमानुष मारहाणीमुळेच, सुषमा अंधारेंचा आरोप

- नरेश डोंगरे  
नागपूर - लॉ चा स्टूडन्ट असलेल्या सोमनाथ सूर्यवंशीची कस्टडी डेथ पोलिसांनी केलेल्या अमाणूष मारहाणीमुळेच झाली. त्यामुळे सूर्यवंशीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर तातडीने गुन्हा दाखल करा, अन्यथा आपण स्वत: परभणीत जाऊन आंदोलन करू, असा ईशारा शिवसेना उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिला.

विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अंधारे यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेत परभणी प्रकरण उचलले. त्या म्हणाल्या, कुठल्याही प्रकारचे नुकसान किंवा तोडफोडीचे समर्थन करणार नाही पण तशी वेळ कुणी आणली याची चौकशी व्हायला पाहिजे. परभणी येथील दंगल सदृश्य परिस्थितीचे सीसीटीव्ही फुटेज बघता ती स्थिती निर्माण करण्यात आल्याचा संशय येतो. मंत्रीपदासाठी शह काटशहाच्या राजकारणातून परभणी अशांत करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोपही त्यांनी केला. परभणीतील घटनेनंतर बंद पुकारण्यात आला होता. त्याच दिवशी भाजपने बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार संदर्भात मोर्चाचे आव्हान केले. जाणीवपूर्वक निळे दुपट्टे गळ्यात घालून गोंधळ निर्माण करण्यात आला. ते लोक कोण होते, असा प्रश्न करीत त्यांनी विशिष्ट लोकांवर गुन्हे दाखल करून चळवळ बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. महिलेशी अश्लाघ्य वर्तन करण्यात आले. पोलीस अमानुष मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ विधी पदवीधर असलेला सोमनाथ याने तयार करण्याचा प्रयत्न केला आणि तोच त्याच्यासाठी जिवघेणा ठरला. त्याला अटक करून पोलिसांनी कोठडीत अमाणूष मारहाण केली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्युला जबाबदार असलेल्या मोंढा पोलीस स्टेशनचे निरीक्षक शरद मरे, तुरनर आणि एलसीबीचे बोरधान या तीनही पोलीस अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करा, या प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करा, दोन दिवसांत हे झाले नाही तर आपण परभणीत जाऊन तीव्र आंदोलन करू, असा इशारा अंधारे यांनी यावेळी दिला.

जबाबदारी कोण घेणार
राज्यातील जनतेला न्याय देण्यासाठी आपण आलो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात. तसे असेल तर आकसबुद्धीने शिकणाऱ्या मुलांवर गुन्हे दाखल केले जाते, त्याची तसेच परभणीसह, बिड, अंबड आणि राज्यातील अन्य ठिकाणी झालेल्या गंभीर प्रकरणांची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल त्यांनी केला. आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू झाले. मात्र, ना विरोधी पक्षनेतेपद, ना लक्षवेधी, ना प्रश्नोत्तरे अशांमध्ये देवा भाऊ, गंभीर प्रश्नांना न्याय कोण देणार, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

भुजबळ राजकीय वादाचे बळी
मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आल्याने छगन भुजबळ नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी रविवारी नागपुरात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याकडे आणि सत्कार समारंभाकडे पाठ फिरवली. लोकमतने आज हे वृत्त प्रकाशित केल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. हा मुद्दा अंधारे यांनी उचलला. भुजबळांना मंत्रीपदापासून दूर ठेवण्यामागे मराठा ओबीसी- वाद असावा, असे सांगतानाच ते राजकारणाचा बळी ठरल्याचे अंधारे म्हणाल्या. राज्यसभेवर नियुक्त करून अजितदादा त्यांचे पुनर्वसन करतील, असा टोलाही त्यांनी लगावला.

Web Title: Somnath Suryavanshi's death in police custody was due to inhuman beating, alleges Sushma Andhare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.