कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत जेजुरीत पारंपारिक धार्मिक विधींसह सोमवती यात्रा संपन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 10:10 AM2020-07-20T10:10:58+5:302020-07-20T10:16:23+5:30
येळकोट येळकोट जय मल्हार चा गजर करत राज्यभरातून सोमवती अमावस्येला जेजुरी येथे लाखो भाविक येत असतात.
बाळासाहेब काळे
जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबारायाची जेजुरी येथे सालाबादप्रमाणे होणारी सोमवती अमावस्येची यात्रा आज (दि. २०)पार पाडली. मात्र दरवर्षीप्रमाणे यावेळी जास्त गर्दी नव्हती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने धार्मिक विधिवत पद्धतीने मोजक्याच प्रमुख लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा जेजुरी गडावर संपन्न झाला.
कोविड 19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभर मंदिरे बंद असल्याने सर्वत्र सण उत्सव मोजक्याच पुजारी सेवकांच्या उपस्थितीत पार पडत आहेत. तीर्थक्षेत्र जेजुरीतही आजची सोमवती यात्रा पारंपरिक पद्धतीने पार पडली. सोमवती यात्रा असल्याने राज्यभरातून लाखो भाविक आले असते. मात्र, लॉकडाऊन आणि कोरोनाचे उच्चाटन करण्यासाठी प्रशासनाने गर्दी टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. जेजुरीत सोमवती यात्रा असूनही प्रशासनाने लाखो भाविकांच्या उपस्थितीत निघणाऱ्या पालखी सोहळ्याला परवानगी नाकारली आहे.
यामुळे मुख्य मानकरी पेशव्यांच्या उपस्थितीत मार्तंड देवसंस्थान, देवाचे पुजारी सेवक, खांदेकरी मानकरी व ग्रामस्थांनी सोमवती अमावस्येचे धार्मिक विधी मंदिरातच मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत करण्याचा निर्णय घेतला होता. तरीही गर्दी होण्याची शक्यता असल्याने पहाटेच यात्रेचे धार्मिक विधी मोजक्याच पुजारी मानकरी, सेवकांच्या उपस्थितीत कर्हा नदीचे पाणी गडावर आणून उत्सवमूर्तींना स्नान घालण्यात आले, महापूजा,अभिषेक, धार्मिक विधी उरकण्यात आले. मुख्य गाभाऱ्यात फुलांची सजावट करण्यात आली होती. रोजमारा वाटप करून यात्रेची सांगता करण्यात आली.