पाण्याच्या रिकाम्या टाकीत पडलेला मुलगा सुखरूप सापडला
By admin | Published: March 11, 2016 01:57 AM2016-03-11T01:57:19+5:302016-03-11T01:57:19+5:30
महापालिका शाळेतील शिपायाच्या हलगर्जीपणामुळे एका लहान विद्यार्थ्याचे प्राण संकटात सापडले. पाण्याच्या रिकाम्या टाकीत तब्बल ४ दिवस थेट मृत्यूबरोबरच त्याला लढा द्यावा लागला.
पुणे : महापालिका शाळेतील शिपायाच्या हलगर्जीपणामुळे एका लहान विद्यार्थ्याचे प्राण संकटात सापडले. पाण्याच्या रिकाम्या टाकीत तब्बल ४ दिवस थेट मृत्यूबरोबरच त्याला लढा द्यावा लागला. गुरुवारी सकाळी तो टाकीत असल्याचे लक्षात आल्यावर त्याला तिथून काढून लगेचच ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने या मुलाचे प्राण वाचले असून, आता त्याची प्रकृती व्यवस्थित आहे.
कासेवाडी येथील महापालिकेच्या संत हरकादास प्राथमिक शाळेत (शाळा क्र. २९) शिवरात्रीच्या दिवशी (सोमवारी) हा प्रकार घडला. फय्याज इम्तियाझ मुलतानी (वय ९, रा. कासेवाडी) असे या मुलाचे नाव आहे. याच शाळेत प्राथमिक वर्गात तो शिकतो. सोमवारी शाळेला सुटी होती. शाळेच्या इमारतीच्या वर पाण्याची रिकामी टाकी आहे. मुले तिथे जात असतात. फय्याज सोमवारी संध्याकाळी तिथे गेला असताना टाकीत पडला. पडताना लागल्यामुळे त्याला वर येता आले नाही. दरम्यान, अंधार पडला. त्याच्या घरचे काळजी करू लागले. स्थानिक कार्यकर्ते भारत कांबळे यांच्यासह खडक पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार त्याच्या पालकांनी नोंदवली.
सोमवारी रात्री, मंगळवारी, बुधवारी दिवसा व रात्रीही फय्याज टाकीतून अधूनमधून मदतीसाठी ओरडत होता. शाळेतील गोंधळामुळे दिवसा त्याचा आवाज कोणाला ऐकू येत नव्हता. आज (गुरुवारी) सकाळी काही मुलांनी तो टाकीकडे गेला असावा, अशी शंका व्यक्त केली. यावरून तिथे शोध घेण्यात आला, त्या वेळी तो टाकीतच पडला असल्याचे आढळले. त्याची अवस्था खराब झाली होती; त्यामुळे त्याला लगेचच ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. पालकांनी शाळेतील शिक्षकांकडे चौकशी केली असता त्यांनी टाकीचा वापर होत नसल्याचे सांगितले. रात्री काही आवाज ऐकू येत होते; मात्र भुताचा आवाज असावा म्हणून दुर्लक्ष केले असल्याची माहिती शिपायाने दिली.
कासेवाडी भागाचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी आज अंदाजपत्रकीय सभेचे कामकाज थांबवून हा प्रश्न उपस्थित केला. त्यांनी दिलेल्या माहितीने सभागृह अवाक् झाले. महापौर प्रशांत जगताप यांनी संबंधित शाळेतील शिपायाला त्वरित निलंबित करावे, असे आयुक्त कुणाल कुमार यांना सुचविले. शिक्षकांचीही चौकशी करावी, अशी मागणी बागवे तसेच सभागृह नेते बंडू केमसे यांनी केली. नगरसेवक सोनल झेंडे, योगेश मुळीक यांनी त्यांच्या भागातही असे प्रकार घडले असल्याचे सांगितले. महापौर जगताप यांनी त्यावर आपल्या दालनात स्वतंत्र चर्चा करू, असे सांगितले.