आईसोबत आलेला मुलगा बुडाला
By admin | Published: May 15, 2017 06:27 AM2017-05-15T06:27:36+5:302017-05-15T06:27:36+5:30
आईसोबत आलेला १३ वर्षीय मुलगा समुद्रात पोहत असताना बुडाला. पुष्कराज राजाराम पाटील (मूळ गाव, बहे ता. वाळवा, जि. सांगली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गुहागर (जि. रत्नागिरी) : आईसोबत आलेला १३ वर्षीय मुलगा समुद्रात पोहत असताना बुडाला. पुष्कराज राजाराम पाटील (मूळ गाव, बहे ता. वाळवा, जि. सांगली. सध्या रा. कऱ्हाड, जि. सातारा) हा रविवारी सकाळी ८ वाजता बुडाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता. पुष्कराजची आई प्रा. राजमती यांना या घटनेचा मोठा धक्का बसला आहे.
कऱ्हाडमधून पाटील कुटुंबीय व त्यांचे नातेवाईक असे सात
जण पर्यटनासाठी शनिवारी गुहागरमध्ये आले. रविवारी
सकाळी सर्वजण समुद्रात पोहण्यासाठी उतरले. अचानक आलेल्या एका मोठ्या लाटेमध्ये पुष्कराज पाण्यामध्ये खेचला गेला. राजाराम पाटील यांना आपला मुलगा बुडत असल्याचे लक्षात आले. त्यांनी पुष्कराजला हात देण्याचा प्रयत्नही केला. मात्र लाटेच्या तडाख्यात पुष्कराज समुद्रात खेचला गेला आणि बुडाला.
मातृदिनी पाटील कुटुंबीयांसमोर पुष्कराज बुडाला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पुष्कराजचे वडील राजाराम पाटील हे आष्टा (सांगली) येथे प्राध्यापक तर आई राजमती या पाटण येथे प्राध्यापिका आहेत.