सोनाली नवांगुळ यांचा साहित्य अकादमीने गौरव, ‘मध्यरात्रीनतंरचे तास’ला अनुवाद पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 01:01 PM2021-09-19T13:01:09+5:302021-09-19T13:03:54+5:30

सन्मानचिन्ह, ५० हजार रुपये आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

Sonali Nawangul honors by Sahitya Akademi, translation award for 'Madhyaratri Nantarche tas' | सोनाली नवांगुळ यांचा साहित्य अकादमीने गौरव, ‘मध्यरात्रीनतंरचे तास’ला अनुवाद पुरस्कार

सोनाली नवांगुळ यांचा साहित्य अकादमीने गौरव, ‘मध्यरात्रीनतंरचे तास’ला अनुवाद पुरस्कार

googlenewsNext

कोल्हापूर : येथील लेखिका सोनाली नवांगुळ यांनी अनुवादित केलेल्या ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या कादंबरीला शनिवारी साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार जाहीर झाला. सन्मानचिन्ह, ५० हजार रुपये आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अपंगत्वावर जिद्दीने विजय मिळवून त्यांनी साहित्य क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्या या धडपडीचा पुरस्काराने गौरव झाला. सोनाली नवांगुळ या ‘लोकमत’मध्ये सातत्याने लेखन करतात. प्रादेशिक भाषेतून हा पुरस्कार त्यांना मिळाला असून, ही कादंबरी स्वातंत्र्याचा आग्रह धरणारी आहे.

‘सलमा’ यांच्या मूळ तामिळी कादंबरीचे इंग्रजीमध्ये भाषांतर करण्यात आले होते. त्याचा अनुवाद नवांगुळ यांनी केला. मनोविकास प्रकाशनच्या ‘भारतातील लेखिका’ या मालेतील हे पुस्तक असून, ते २०१५ साली प्रकाशित झाले हाेते. आतापर्यंत त्यांनी तीन स्वतंत्र पुस्तके लिहिली असून, नवांगुळ ब्रेल लिपीतील ‘स्पर्शज्ञान’ या पाक्षिकाचे संपादन करत आहेत. पुणे येथील अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. नवव्या वर्षी पाठीवर बैलगाडी पडल्याने पॅराप्लेजिक झाल्याने घरातच राहून पदवीपर्यंतच्या परीक्षा त्यांनी दिल्या. २००० साली त्यांनी कोल्हापूर येथील ‘हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड’ संस्थेत सोशल वर्कर म्हणून काम पाहिले. २००७ पासून त्यांनी स्वतंत्रपणे काम सुरू केले. 

मंजुषा कुलकर्णी, जयश्री शानभाग यांचाही सन्मान
डॉ. मंजुषा कुलकर्णी यांना प्रकाश आमटे यांच्यावरील 'प्रकाशवाटा' या पुस्तकाच्या संस्कृत अनुवादासाठी तर जयश्री शानभाग यांनी कोकणीत अनुवादित केलेल्या 'स्वप्न सारस्वत' या कादंबरीलाही साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. डॉ. मंजुषा कुलकर्णी यांची २५ पुस्तके प्रकाशित असून, त्यांना अध्यापनाचा २१ वर्षांचा अनुभव आहे. एमपीएससी परीक्षेत प्रथम येण्याचा मानही त्यांनी मिळवला होता. पुणे विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठात त्या प्रथम आल्या होत्या. त्यांना विविध राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले असून, ख्यातनाम व्याख्याता, कवयित्री, लेखिका, निवेदिका, सूत्रसंचालिका म्हणूनही त्या परिचित आहेत. त्यांनी नाट्यप्रयोग, एकपात्री प्रयोगही केले आहेत.

साहित्य अकादमीसारख्या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेने दिलेल्या पुरस्काराने नवी उमेद मिळाली. असे पुरस्कार आगामी वाटचालीसाठी प्रेरणा देणारे ठरतात.
- सोनाली नवांगुळ
 

Web Title: Sonali Nawangul honors by Sahitya Akademi, translation award for 'Madhyaratri Nantarche tas'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.