सोनार यांच्या पुस्तकाला जयवंत दळवी पुरस्कार
By admin | Published: September 20, 2016 03:06 AM2016-09-20T03:06:00+5:302016-09-20T03:06:00+5:30
जयवंत दळवी स्मृती पुरस्कारासाठी यंदा प्रा. अनिल सोनार यांच्या ‘उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक’ या विनोदी लेखसंग्रहाची पुरस्कार समितीने निवड केली
मुंबई : मॅजेस्टिक प्रकाशनतर्फे देण्यात येणाऱ्या जयवंत दळवी स्मृती पुरस्कारासाठी यंदा प्रा. अनिल सोनार यांच्या ‘उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक’ या विनोदी लेखसंग्रहाची पुरस्कार समितीने निवड केली आहे. या पुरस्काराचे स्वरूप ११ हजार १११ रुपये आणि स्मृतिचिन्ह असे आहे. यावर्षी ‘विनोद’ या वाङ्मय प्रकारासाठी पुरस्कार ठेवण्यात आला होता.
ज्येष्ठ लेखक मुकुंद टाकसाळे यांच्या हस्ते ८ आॅक्टोबर रोजी पुण्यात या पुरस्काराचे वितरण होईल. जयवंत दळवी स्मृती पुरस्काराचे यंदा २० वे वर्ष आहे. ‘उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक’ हा विनोदी लेखसंग्रह मनोरमा प्रकाशन, मुंबई यांनी प्रकाशित केला आहे.
प्रा. दीपक घारे, नीलिमा भावे आणि प्रा.जयप्रकाश लब्धे यांच्या निवडसमितीने अनिल सोनार यांच्या या विनोदी लेखसंग्रहाची जयवंत दळवी स्मृती पुरस्कारासाठी एकमताने निवड केली.
प्रा. अनिल सोनार यांनी या विनोदी लेखांमधून भोवतालच्या समाजात घडणाऱ्या सामाजिक, सांस्कृतिक घडामोडींवर आणि मानसिकतेवर खुमासदार शैलीत भाष्य केले आहे. फाडफाड इंग्रजी, चायनीज फूड, बुवाबाजी, वास्तुशास्त्र, चित्रपटगीते, साहित्य, भविष्याचे वेड अशा अनेक विषयांवर लिहिताना अनिल सोनार रोजच्या जीवनातील विसंगती टिपतात आणि शाब्दिक कोट्या, उपहास, विडंबन अशा विविध प्रकारांतून विनोदाची निर्मिती करतात.
जीवनसंघर्षाकडे सकारात्मक उमदेपणाने पाहण्याची मराठी विनोदी लेखनाची परंपरा अनिल सोनार यांच्या लेखनात टिकून असल्याने निवडसमिती या संग्रहाची शिफारस करीत आहे, असे मत समितीने या पुस्तकाची निवड करताना व्यक्त केले. (प्रतिनिधी)