सोनसाखळी २६ वर्षांनंतर मिळाली!
By admin | Published: September 22, 2016 02:40 AM2016-09-22T02:40:23+5:302016-09-22T02:40:23+5:30
मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नगरसेविका डॉ. शुभा राऊळ यांची २६ वर्षांपूर्वी चोरी झालेली सोनसाखळी परत मिळाली आहे.
मुंबई : मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नगरसेविका डॉ. शुभा राऊळ यांची २६ वर्षांपूर्वी चोरी झालेली सोनसाखळी परत मिळाली आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या कामगिरीने आणि राऊळ यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाल्याची चर्चा बुधवारी दिवसभर मुंबईकरांत रंगली होती. या अनपेक्षित भेटीबद्दल शुभा राऊळ यांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत.
२६ वर्षांपूर्वी वरळीच्या पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयासमोरून राऊळ यांची सोनसाखळी चोरीला गेली होती. येथील बसथांब्यावर उभ्या असताना ही घटना घडली होती. त्यानंतर पाठपुरावा करूनही अखेर राऊळ यांनी सोनसाखळीची आशा सोडली होती. मात्र चोरांच्या मुसक्या आवळत पोलिसांनी ही सोनसाखळी मॅजिस्ट्रेट कोर्टात जमा केली होती. केवळ पत्ता बदलामुळे राऊळ यांना ती वेळीच मिळू शकली नाही. नुकत्याच मिळालेल्या पत्रानंतर चोरीची सोनसाखळी विक्रोळीच्या ३४ क्रमांकाच्या न्यायालयात टिळकनगर पोलिसांनी त्यांच्याकडे सुपुर्द केली.
राऊळ यांनी २००७ ते २००९ या दोन वर्षांसाठी मुंबईचे महापौरपद भूषवले होते. दहिसर येथे राहणाऱ्या शुभा राऊळ यांचे शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्याबरोबर तीव्र मतभेद झाले होते. (प्रतिनिधी)