रेडिओलॉजिस्ट अभावी सरकारी रुग्णालयांमधील सोनोग्राफी बंद
By Admin | Published: March 4, 2015 01:50 AM2015-03-04T01:50:53+5:302015-03-04T01:50:53+5:30
ठाणे, रायगड, पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागातील सरकारी रुग्णालयांना मिळालेल्या निधीतून खरेदी केलेली सोनोग्राफी मशिन्स रेडिओलॉजिस्ट अभावी धूळखात पडली आहेत.
पुणे : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन अंतर्गत ठाणे, रायगड, पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागातील सरकारी रुग्णालयांना मिळालेल्या निधीतून खरेदी केलेली सोनोग्राफी मशिन्स रेडिओलॉजिस्ट अभावी धूळखात पडली आहेत. त्यामुळे गरोदर माता आणि बालमृत्यू रोखण्याच्या उपायांमध्ये अडचणी येत आहेत.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनच्या (एनआरएचएम) अंमलबजावणीला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर कामाचा आढावा घेण्यासाठी राज्यव्यापी आरोग्य यात्रेअंतर्गत पाहणी सुरू आहे. त्यासाठी १३ जिल्ह्यांतील काही तालुके निवडण्यात आले आहेत. त्यात ठाणे जिल्ह्यातील शहापूर, पुणे जिल्ह्यातील वेल्हा, पुरंदर, रायगडमधील कर्जत या तालुक्यांमधील सरकारी रुग्णालयांची पाहणी करण्यात आली. गरोदर महिलांची सोनोग्राफी करणे आवश्यक असते. त्यामुळे गरोदर माता व बालमृत्यूचे प्रमाण रोखले जाऊ शकते.
आरोग्ययात्रेदरम्यान झालेल्या जनसुनवाईमध्ये सोनोग्राफी बंद असल्याचा मुद्दा जोरदारपणे मांडण्यात आला. खासगी रुग्णालयांमधून सोनोग्राफीसाठी सीएसआर अंतर्गत खर्च देण्यात येईल. तसेच रेडिओलॉजिस्टला योग्य मोबदला देऊन ते उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. आरोग्य सेविकांच्या गावभेटी होत नाहीत, डॉक्टर रात्री थांबत नाहीत, अंगणवाडी सुरू झालेली नाही, असेही प्रश्न आदिवासींनी मांडले. साथी संस्थेचे शैलेश डिकळे, तृप्ती जोशी, बी.जे. मेडिकल कॉलेजचे डॉक्टर निलोफर बिजली, दिनकर पाटील आदी या पाहणी पथकात होते. (प्रतिनिधी)
च्रेडिओलॉजिस्ट मिळत नसल्याने रुग्णांना शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी करून घ्यावी लागत आहे. आदिवासी व गरीब महिलांना सोनोग्राफीवर खर्च करणे शक्य नसल्याने माता व बाळाच्या जिवावर बेतल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आरोग्ययात्रेदरम्यान झालेल्या जनसुनवाईमध्ये सोनोग्राफी बंद असल्याचा मुद्दा जोरदारपणे मांडण्यात आला.