सोनू निगमने मुंडण केल्यानंतर मुस्लिम नेत्याची पलटी, 10 लाख देण्यास नकार
By admin | Published: April 20, 2017 12:13 PM2017-04-20T12:13:03+5:302017-04-20T12:15:48+5:30
सोनू निगमचं मुंडण करणा-याला 10 लाखांचं बक्षीस जाहीर करणारे मुस्लिम नेते सय्यद शाह आतेफ अली कादरी यांनी पलटी मारली आहे
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 - मशिदीवरील भोंग्यांवरून होणाऱ्या अजानबाबत वादग्रस्त ट्विट करून चर्चेत आलेल्या गायक सोनू निगमने, एका मुस्लीम मित्राकडून मुंडण करून घेत, मुस्लीम नेत्याने दिलेल्या धमकीला सडेतोड उत्तर दिले. मात्र यानंतर सोनू निगमचं मुंडण करणा-याला 10 लाखांचं बक्षीस जाहीर करणारे पश्चिम बंगालमधील अल्पसंख्याक युनायटेड काउंसिलचे उपाध्यक्ष सय्यद शाह आतेफ अली कादरी यांनी पलटी मारली आहे. "सोनू निगमने सर्व अटींची पुर्तता केली नसल्याने आपण त्याला 10 लाख रुपये देणार नसल्याचं", त्यांनी सांगितलं आहे.
सोनू निगमने १७ एप्रिल रोजी मशिदीवरील भोंग्याद्वारे होणा-या अजानवर आक्षेप नोंदविणारे ट्विट केले होते. यानंतर सय्यद शाह आतेफ अली कादरी यांनी सोनू निगमचे मुंडण करून त्याला जुन्या चपलांचा हार घालणाऱ्याला १० लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. सोनू निगमने आपला मित्र हकिम आलीम याच्याकडून आपले केस कापून घेत, मुस्लीम नेते सय्यद कादरी यांना जशास तसे उत्तर दिले. कादरी यांनी आता दहा लाख रुपये तयार ठेवावेत, असे आवाहनही केले. त्यावर कादरी यांनी उत्तर दिले असून, सोनू निगमला जुन्या चपलांचा हार घालून रस्त्यांवरून फिरविणाऱ्यांना दहा लाखांचे बक्षीस दिले जाईल, असे म्हटले आहे.
Today at 2pm Aalim will come to my place, and shave my head. Keep your 10 lakhs ready Maulavi. https://t.co/5jyCmkt3pm
— Sonu Nigam (@sonunigam) April 19, 2017
"मी तीन गोष्टी सांगितल्या होत्या. त्यामध्ये सोनू निगमला चपलांचा हार घालून देशातील प्रत्येक घरात घेऊन जावे असंही म्हटलं होतं. त्यानंतरच मी 10 लाख रुपये देईन", असं सय्यद कादरी बोलले आहेत.
God bless everyone. I"m not a Muslim and I have to be woken up by the Azaan in the morning. When will this forced religiousness end in India
— Sonu Nigam (@sonunigam) April 16, 2017
And by the way Mohammed did not have electricity when he made Islam.. Why do I have to have this cacophony after Edison?
— Sonu Nigam (@sonunigam) April 17, 2017
बुधवारी सोनू निगमने पत्रकार परिषद घेत बाजू मांडली. ज्या व्यक्तीने संपूर्ण आयुष्यात मोहम्मद रफी यांना वडील मानले, ज्याच्या गुरूचे नाव उस्ताद गुलाम मुस्तफा खान आहे, तो मुस्लीमविरोधी कसा असू शकतो, असा सवाल त्याने केला.
प्रत्येकाला मते मांडण्याचा अधिकार आहे. आपल्या भावनांचा व टिष्ट्वटचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. अजानला नव्हे, तर मशिदीवर कर्कश्श आवाजात वाजणाऱ्या लाउडस्पीकरला माझा विरोध आहे, पण याचा चुकीचा अर्थ लावला. लोक धार्मिक उत्सवाच्या नावाखाली रस्त्यावर उतरतात. मिरवणुकीत गाणे मोठ्या आवाजात वाजवितात, मद्य सेवन करून जनतेला त्रास देतात, असेही सोनू म्हणाला.
मुस्लिम मित्राकडून कापले केस -
सोनू निगमने हेअर स्टायलिस्ट अलीमला भर पत्रकार परिषदेत बोलावून घेतलं आणि केस कापून टक्कल केलं. आलिम हा सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट म्हणून प्रसिद्ध आहे. "सोनू निगमने कोणत्याही विशिष्ट धर्माबत विधान केले नाही. त्याने लाऊडस्पिकरचा मुद्दा उठवला होता", असे म्हणत हेअर स्टायलिस्ट आलिमने सोनू निगमच्या विधानांचं समर्थन केलं आहे.
नेमके काय होते ट्विट -
‘मी मुस्लीम नाही, तरीही रोज सकाळी अजानमुळे माझी झोपमोड का? ही बळजबरी कधी थांबणार?’ असा सवाल सोनू निगमने ट्विटरवर केला होता. "मोहम्मद यांनी ज्यावेळी इस्लामची सुरुवात केली, त्या काळात वीज नव्हती. मग एडिसननंतर हा कर्कश आवाज का?, जे लोक धर्माचे अनुयायी नाहीत, त्यांना भोंगे लावून उठवणाऱ्या कोणत्याही मंदिर किंवा गुरुद्वारावर माझा अजिबात विश्वास नाही", असंही ट्वीट सोनू निगमनं केलं होतं.
अजान म्हणजे काय?
नमाज अदा करण्याआधी मस्जिदमध्ये लोकांना बोलवण्यासाठी अजान दिली जाते. अजानचा अर्थ बोलावणं किंवा घोषणा करणं असा होतो. नमाजच्या आधी दिवसातून पाच वेळा अजान दिली जाते.