LMOTY 2020 : 'सोनू सूद हे करू शकतो तर सरकार का नाही?'; अभिनेत्याच्या उत्तरानं जिंकली सर्वांची मनं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 04:29 PM2021-03-18T16:29:09+5:302021-03-18T16:38:54+5:30
Sonu Sood in LMOTY 2020 : लॉकडाऊन दरम्यान मुंबईतून दुसऱ्या राज्यात आपल्या गावी जाणाऱ्यांसाठी सोनू सूद हा सुपरहिरोच ठरला. या लोकांना मदत करण्याचं त्याचं हे काम अजूनही थांबलेलं नाही.
मुंबई - अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) कोरोनाच्या या लढ्यात हजारो लोकांना मदतीचा हात दिला. लॉकडाऊन दरम्यान मुंबईतून दुसऱ्या राज्यात आपल्या गावी जाणाऱ्यांसाठी सोनू सूद हा सुपरहिरोच ठरला. या लोकांना मदत करण्याचं त्याचं हे काम अजूनही थांबलेलं नाही. आताही तो कित्येकांना रोजगार मिळवून देण्यासाठी धडपडत आहे. यावेळी सोनू बेरोजगारांच्या मदतीला धावून आला असून त्यांच्यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. आता तर त्याच्या एका गोष्टीमुळे 10 कोटी लोकांचं आयुष्य बदलणार आहे. याच दरम्यान 'सोनू सूद हे करू शकतो तर सरकार का नाही?' असा प्रश्न अभिनेत्याला विचारण्यात आला होता. त्यावर सोनू सूदने जबरदस्त उत्तर दिलं असून या उत्तराने सर्वांचं मन जिंकलं आहे.
अभिनेता सोनू सूदने "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवॉर्ड 2020" (Lokmat Maharashtrian Of The Year Award 2020) सोहळ्याला उपस्थिती लावली. याचवेळी लॉकडाऊनमध्ये केलेल्या अनेक कामांबाबत काही प्रश्न विचारण्यात आले. 'सोनू सूद हे करू शकतो तर सरकार का नाही? असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर सोनूने उत्तर दिलं आहे. "सरकार पण आपलं काम करत आहे. आपला सर्वात मोठा प्रोब्लेम हा आहे की आपण सर्व गोष्टी या सरकारवर ढकलतो. जर आपण एखाद्या नेत्याला निवडलं आहे तर त्याचं काम हे आहे किंवा एखाद्या भागाचा हा मंत्री आहे तर त्याचं हे काम आहे असं म्हणतो. जनतेने मत देऊन नेतेमंडळींना निवडून दिल्यानंतर पाच वर्षांत ते काय काम करतात याची वाट पाहत राहतात."
Sonu Sood : सोनू सूद पुन्हा बनला मसिहा! एक लाख लोकांना नोकरी देणार, 10 कोटी लोकांचं आयुष्य बदलवणार https://t.co/vkbwUoNc4a#SonuSood#JOB#GoodWorkerApp#India
— Lokmat (@MiLOKMAT) March 17, 2021
"त्या पाच वर्षात नागरिकांनीही काम केलं पाहिजे. सरकार तर त्यांचं काम करतच राहणार पण आपण वैयक्तितरित्या जे काही करू शकतो त्यासाठी कोणतीही सीमा नाही. आपण आपल्या विचारात थोडा बदल आणू शकतो" असं सोनू सूदने म्हटलं आहे. तसेच "देशातील सर्वात मोठी ब्लड बँक मी आता उभारणार असून देशातील प्रत्येक व्यक्ती ही त्या ब्लड बँकेसोबत जोडली गेलेली असेल. त्यामुळे जेव्हापण तुमच्या मनात विचार येतो. तेव्हा कुठून, कसा सपोर्ट मिळेल याची वाट पाहून नका. लोकांचा आशीर्वाद कायम सोबत असतो. त्यामुळे पाऊल टाका म्हणजे लोक देखील आपोआप तुमच्यासोबत जोडले जातील" असं देखील अभिनेत्याने म्हटलं आहे.
सोनू सूदचे नागपूरशी आहे खूप जवळचे नाते, कसे ते घ्या जाणून
अभिनेता सोनू सूदने आपल्या अभिनय कौशल्यासोबतच अनेकांना मदत करून लोकांच्या मनात स्थान मिळवले आहे. फार कमी लोकांना माहित असेल की मूळचा सोनू सूद पंजाबचा असला तरी त्याचे नागपूरशी फार जवळचे संबंध आहेत आणि नागपूरबद्दल बोलताना नेहमी तो भरभरून बोलतो. याचा प्रत्यय नुकताच लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवॉर्ड 2020 सोहळ्यात आला. या सोहळ्याला सोनू सूदने हजेरी लावली आहे. यावेळी सोनू सूदने नागपूरशी त्याचे असलेल्या कनेक्शनबद्दल सांगितले. तो म्हणाला की, नागपूरशी माझे खूप जवळचे नाते आहे. माझ्या जीवनात नागपूरचे खूप मोठे योगदान आहे. मी पंजाबमधून नागपूरला आलो होतो. खूप काही मला नागपूरने दिले आहे. अभिनेता बनण्यासाठीची दिशा मला इथूनच मिळाली.