ईडीचं पथक घरी पोहोचताच शिवसेना नेते आनंद अडसूळांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 12:05 PM2021-09-27T12:05:57+5:302021-09-27T12:13:01+5:30
सिटी सहकारी बँक घोटाळा प्रकरणी आमदार रवि राणा यांच्या तक्रारीनंतर ईडीने आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांना समन्स बजावत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई - सिटी को -ऑपरेटिव्ह बँकेतील ९८० कोटीच्या घोटाळयाच्या आरोपप्रकरणी अमरावतीचे माजी शिवसेना खासदार तथा बँकेचे माजी अध्यक्ष आनंदराव अडसूळ आणि त्यांचा मुलगा अभिजित यांना ईडीने समन्स बजावले आहे. एवढेच नाही, तर अडसूळ यांच्या मुंबईतील कांदिवली येथील घरी सकाळी 8 वाजल्यापासून छापेमारी सुरू झाली आहे. यानंतर, आता अडसूळ यांची प्रकृती अचानकच खालावली. त्यांना रुग्णवाहिकेतून गोरेगाव येथील लाईफ लाईन मेडीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अभिजीत अडसूळही त्यांच्यासोबत रुग्णालयात आहे.
सिटी सहकारी बँक घोटाळा प्रकरणी आमदार रवि राणा यांच्या तक्रारीनंतर ईडीने आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांना समन्स बजावत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना ईडीचे समन्स; सिटी बँक घोटाळा प्रकरणी हजर राहण्याचे आदेश
सीटी बँकेमध्ये कामगार, पेंशनधारक, ९९ टक्के मराठी लोकांची खाती होती. जवळपास ९ हजार खातेधारक होते. त्या बँकेतील खातेदारांचे पैसे अवैधरित्या बिल्डरांना वाटण्यात आले. त्यात अडसूळांनी २० टक्के कमिशन घेतले. त्यामुळे बँक पूर्ण बुडाली. यामध्ये जवळपास ९८० कोटींचा घोटाळा झाला आहे. दोन वर्षांपूर्वी एफआयआर होऊनही मुख्यमंत्री शिवसेनेचा असल्यामुळे ही चौकशी केली नाही, असा आरोप आमदार रवि राणा यांनी केला आहे. ईडीमध्ये दाखल केलेल्या तक्रारीनंतर आता आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांना ईडीने समन्स बजात चौकशीसाठी प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगितले जात आहे.
दरम्यान, मुंबई येथील सिटी बँकेत ९८० कोटींचा घोटाळा झाल्याप्रकरणी करण्यात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ईडीने हे समन्स बजावल्याची माहिती आहे. आनंदराव अडसूळ यांनी सिटी बँकेत भ्रष्टाचार केला असून, सर्वसामान्य ठेवीदार, गोरगरीब नागरिक, ज्येष्ठ पेंशनधारक यांची आयुष्यभराची जमा रक्कम, गिरणी कामगारांचे पैसे परस्पर लाटल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी ईडीकडे नोंदविलेल्या तक्रारीत केला आहे. ईडीने याआधीही अडसुळांसह माजी आमदार तथा बँकेचे संचालक अभिजीत अडसूळ व जावई यांची घरे, कार्यालयांची झाडाझडती घेतली होती.