औद्योगिक विजेच्या दराबाबत लवकरच सकारात्मक निर्णय
By admin | Published: January 23, 2016 03:59 AM2016-01-23T03:59:32+5:302016-01-23T03:59:32+5:30
राज्यातील उद्योजकांच्या अडचणी लक्षात घेऊन राज्य शासन औद्योगिक विजेचे दर कमी करण्याच्या दृष्टीने लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती
मुंबई : राज्यातील उद्योजकांच्या अडचणी लक्षात घेऊन राज्य शासन औद्योगिक विजेचे दर कमी करण्याच्या दृष्टीने लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
राज्यातील उद्योग टिकून राहून तो वृद्धिंगत व्हावा यादृष्टीने शेजारील राज्यांप्रमाणे उद्योगांना विजेच्या दरात सवलत देण्यात यावी, या उद्योजकांच्या मागणीबाबत उद्योजकांच्या अडचणी लक्षात घेऊन ऊर्जा विभाग शेजारील राज्याप्रमाणे विजेचे दर समपातळीवर आणण्यासाठी तोडगा काढण्यात येईल. मराठवाडा, विदर्भातील औद्योगिक विजेचे दर कमी करण्याच्या दृष्टीने माहिती घेण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आल्याचे देसाई यांनी या वेळी सांगितले. (प्रतिनिधी)
‘मेक इन इंडिया’ सप्ताह फेब्रुवारीला महाराष्ट्रात होत आहे, ही अभिमानाची बाब आहे. या सप्ताहामध्ये महाराष्ट्राच्या उद्योगाच्या प्रगतीचे प्रदर्शन, लघू उद्योगाचा विकास, लघू उद्योजकांना मार्गदर्शन करणारे वेगवेगळ्या विषयांवरील चर्चासत्र, उद्योजकांच्या यशोगाथा आदी कार्यक्र मांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.
किरकोळ व्यापार धोरणाचा मसुदा
किरकोळ व्यापारामध्ये व्यवसायाच्या चांगल्या संधी असून, त्या वृद्धिंगत होण्यासाठी किरकोळ व्यापार धोरणाचा अंतिम मसुदा तयार करण्यात आला आहे. हा मसुदा मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच मांडण्यात येणार आहे. फळे, भाजीपाला, दूध यांसारख्या नाशवंत मालाचा समावेश अत्यावश्यक सेवामध्ये करून त्या महाराष्ट्र जीवनाश्यक कायद्यांतर्गत आणण्याचा शासनाचा विचार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल, असा विश्वासही देसाई यांनी व्यक्त केला.