लवकरच डाक घर आपके द्वार!
By admin | Published: July 5, 2016 01:14 AM2016-07-05T01:14:02+5:302016-07-05T01:14:02+5:30
डाक सेवक देणार नागरिकांना घरपोच सेवा.
राम देशपांडे / अकोला
आधुनिकीकरणाच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या भारतीय डाक विभागाच्यावतीने लवकरच डाक घर आपके द्वार ही योजना सुरू होणार आहे. यात डाक सेवकांच्या (पोस्टमन) माध्यमातून नागरिकांना घरबसल्या डाक तिकीट, पोस्टकार्ड आणि लिफाफे विकत घेता येतील. तसेच स्पीड पोस्ट व साधारण पत्र पाठवता येईल. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी डाक सेवकांना विशेष उपकरण दिले जाणार असल्याची माहिती अकोला प्रवर डाक अधीक्षक एन. पी. आरसे यांनी दिली.
भारतीय डाक विभागाने काळानुरूप आपला चेहरा मोहरा बदलून आत्याधुनिकीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. सध्याच्या घटकेला बँकिंग क्षेत्रात भरारी घेण्याचे ध्येय बाळगून असलेला भारतीय डाक विभाग लवकरच डाक घर आपके द्वार या योजनेद्वारे डाक घरात दिल्या जाणार्या बहुतांश सुविधा नागरिकांना घरपोच देणार आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजवाणीसाठी सर्व डाक सेवकांची मदत घेतली जाणार आहे. त्याकरिता प्रत्येक डाक सेवकास एक विशेष उपकरण देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत नागरिकांना घरबसल्या डाक सेवकांकडून डाक तिकिटे, पोस्ट कार्ड, लिफाफे आदी खरेदी करता येतील. तसेच डाक सेवकांजवळील उपकरणाच्या साहाय्याने नागरिकांना स्पीड पोस्ट आणि साधारण पोस्ट अशा विविध सेवांचा लाभ नागरिकांना घरबसल्या किंवा ऑफिसमध्येच घेता येणार आहे. या योजनेची प्रथामिक चाचणी मुंबईतील भांडुप ईस्ट आणि छिंदवाडा येथे घेण्यात आली असून, तिच्या यशस्वीतेनंतरच भारतीय डाक विभागाने ही योजना संपूर्ण भारतात टप्प्या टप्प्याने राबविण्याचा निर्णय घेतला असल्याचे आरसे यांनी स्पष्ट केले.
डाक विभागाची स्थिती उत्तम
गत काळात डाक विभागाची जी ओळख होती त्यात यत्किंचितही बदल झालेला नसल्याची माहिती मुख्य डाक घरातील अधिकार्यांनी दिली. मोबाइल, इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वाढता प्रभाव लक्षात घेता डाक विभागामार्फत दिल्या जाणार्या सुविधांची मागणी कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अकोला विभागात महिन्याकाठी ५0 हजार पोस्टकार्डांची, ४0 हजार लिफाफ्यांची, तर १ रुपयासून ते २0 रुपयांपर्यंतच्या सुमारे १0 लाख रुपयांच्या डाक तिकिटांची महिन्याकाठी विक्री होत असून गत काळात भारतीय डाक विभागाने सुरू केलेली माय स्टँम्प योजना लवकरच शाळा-महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येणार असल्याचे या विभागातर्फे सांगण्यात आले.