सत्ता दिसू लागताच शिवसेनेत खदखद

By admin | Published: December 2, 2014 02:49 AM2014-12-02T02:49:25+5:302014-12-02T09:08:40+5:30

सुभाष देसाई यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याकरिता विधान परिषदेची एक जागा शिवसेनेने भाजपाकडे मागून घेतली आहे. संभाव्य मंत्री म्हणून सुभाष देसाई, दि

As soon as the power is seen, the Shiv Sena has the power to destroy it | सत्ता दिसू लागताच शिवसेनेत खदखद

सत्ता दिसू लागताच शिवसेनेत खदखद

Next

मुंबई : शिवसेनेला चार कॅबिनेट व आठ राज्यमंत्रीपदे देण्याची तयारी भाजपाने दाखवली असून सत्तेत सहभागी होण्यास शिवसेना जवळपास राजी झाली आहे, पण मंत्रिमंडळातील समावेशावरून शिवसेनेत असंतोषाचा उद्रेक होण्याची चिन्हे आहेत.
राज्य मंत्रिमंडळात आपला समावेश होणार किंवा कसे याबाबत माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम हे साशंक असल्याने त्यांनी सत्तेतील सहभागाबाबत शिवसैनिकांचे मत अजमावून पाहण्याचा सल्ला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला होता. तर दुसरीकडे, विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांना वाटाघाटीत कुठेच सहभागी करून घेण्यात न आल्याने तेही नाराज झाले आहेत. शिंदे यांना चर्चेत सहभागी करून न घेता विदर्भातील दुष्काळी दौऱ्यावर धाडण्यात आले आहे. सुनील प्रभू यांच्या संभाव्य समावेशामुळे रवींद्र वायकर हे अस्वस्थ आहेत.
सुभाष देसाई यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याकरिता विधान परिषदेची एक जागा शिवसेनेने भाजपाकडे मागून घेतली आहे. संभाव्य मंत्री म्हणून सुभाष देसाई, दिवाकर रावते, डॉ. नीलम गोऱ्हे, डॉ. दीपक सावंत या विधान परिषद सदस्यांच्याच नावाची चर्चा असल्याने विधानसभेत दोन-तीन टर्म निवडून येणाऱ्या आमदारांनी काय करायचे, अशी खदखद सेनेत आहे. राज्य मंत्रिमंडळात समावेश करताना प्रादेशिक व जातीय समतोल विचारात न घेता केवळ मुंबईतील नेत्यांचा व आमदारांचा समावेश झाल्यास शिवसेनेत नाराजी उफाळून येईल, असे काहींचे मत आहे. मराठवाड्यातून अर्जुन खोतकर, पश्चिम महाराष्ट्रातून राजेश क्षीरसागर आणि विदर्भातून संजय राठोड यांना संधी मिळणार की नाही, अशी विचारणा होत आहे. (विशेष प्रतिनिधी)

---------------

भाजपा-सेनेत रात्री खलबते
राज्यातील सत्तेत सहभागी होण्यास शिवसेना जवळपास राजी झाल्याचे वृत्त असून मंत्रिपदांच्या वाटपाबाबत मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर भाजपा व सेनेत सोमवारी रात्री पुन्हा खलबते सुरू झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे आणि सेनानेते सुभाष देसाई व खा. अनिल देसाई यांच्यात चर्चा झाली. मात्र मंत्रिपदाच्या वाटपावर सहमती झाली का नाही, हे कळू शकले नाही.

Web Title: As soon as the power is seen, the Shiv Sena has the power to destroy it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.