शेतकऱ्यांना लवकरच सरसकट कर्जमाफी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 06:20 AM2019-05-21T06:20:59+5:302019-05-21T06:21:12+5:30
राज्य सरकारची तयारी सुरू; जिल्हाधिकाऱ्यांकडून मागविली कर्जाची आकडेवारी
- यदु जोशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित शेतकºयांना कर्जमाफी देण्याच्या हालचाली सुरू असून, लवकरच तसा निर्णय होणार आहे. थकबाकीदार शेतकरी व थकबाकीची माहिती जिल्ह्याजिल्ह्यातून मागविण्यात आली आहे.
आतापर्यंत दिलेल्या कर्जमाफीत मार्च, २०१६ पर्यंत काढलेले कृषिकर्ज व थकबाकीदार शेतकºयांचा समावेश करण्यात आहे. आता २०१६-१७ आणि २०१८ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकºयांनाही कर्जमाफीचा लाभ दिला जाणार असल्याचे कळते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. अन्य कारणांनी कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्यांनाही कर्जमाफी दिली जाणार आहे.
शेतकºयांना सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे, असा आग्रह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धरला होता. आपली ही अट मान्य केल्यानेच आपण युतीसाठी तयार झालो, असे ठाकरे यांनी म्हटले होते. राज्य सरकारने आतापर्यंत राज्यातील ४३ लाख ३५ हजार शेतकºयांना १८ हजार २३५ कोटी रुपयांची कर्जमाफी दिली आहे.
मुख्यमंत्री काढणार विकास यात्रा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चार महिन्यांनंतर होणाºया विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात विकास यात्रा काढणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासाचा लेखाजोखा आणि पुढील पाच वर्षांतील विकासाची ब्ल्यू प्रिंट घेऊन ते जनतेत जातील, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. राज्यात समाधानकारक पाऊस झाला, तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात ही यात्रा सुरू होईल. शेकडो गावांमधील नागरिकांशी ते संवाद साधणार आहेत. प्रदेश भाजपच्या वतीने ही यात्रा काढली जाईल.
लोकसभा निवडणुकीचे अहवाल मागविले
लोकसभा निवडणुकीचे चिंतन मंथन करण्यासाठी प्रदेश भाजपची बैठक मंगळवारी मुंबईत होत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष आणि संघटनमंत्री उपस्थित राहतील. या बैठकीपूर्वीच राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांकडून लोकसभा निवडणुकीचे अहवाल मागविण्यात आले आहेत. शिवसेनेने लढविलेल्या जागांवर असलेल्या भाजपच्या जिल्हाध्यक्षांकडूनही हे आॅनलाइन अहवाल चार दिवसांपूर्वीच घेण्यात आले.