ज्वारीची भाकरीही महागली; ज्वारी ६० ते ८० रुपये किलो दराने विक्री
By नामदेव मोरे | Published: November 25, 2023 08:33 AM2023-11-25T08:33:44+5:302023-11-25T08:35:11+5:30
मुंबई बाजार समितीमध्ये किलोला विक्रमी ३५ ते ७२ रुपये भाव
नामदेव मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : गतवर्षी उत्पादन कमी झाल्यामुळे राज्यात सर्वत्र ज्वारीची आवक कमी झाली असून, बाजारभाव वाढू लागले आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये शुक्रवारी ज्वारीला प्रतिकिलो ३५ ते ७२ रुपये असा विक्रमी भाव मिळाला. किरकोळ मार्केटमध्येही ज्वारी ६० ते ८० रुपये किलो दराने विकली जात आहे. पुढील काही महिने बाजारभाव तेजीतच राहण्याची शक्यता आहे.
ज्वारीची भाकरी ही सर्वसामान्य नागरिकांच्या आहारामधील महत्त्वाचा घटक आहे. परंतु, मागील काही दिवसांपासून ज्वारीचे दर वाढू लागल्यामुळे सामान्य नागरिकांना भाकरी परवडेनाशी झाली आहे. गतवर्षी राज्यात सर्वत्र उत्पादन कमी झाले आहे. यामुळे यावर्षी नोव्हेंबरमध्येच तुटवडा निर्माण झाला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये जानेवारीत ३० ते ४५ रुपये दराने ज्वारीची विक्री होत होती. आता हेच दर ३५ ते ७२ रुपये किलोवर पोहोचले आहेत. राज्यातील इतर बाजार समित्यांमध्येही २५ ते ७२ रुपये किलो दराने ज्वारीची विक्री होत आहे.
महिना बाजारभाव
(प्रति किलो/रु.)
जानेवारी ३० ते ४५
फेब्रुवारी २९ ते ४७
मार्च २८ ते ५०
एप्रिल २८ ते ५०
मे २८ ते ५०
जून ३० ते ५०
जुलै २८ ते ५५
ऑगस्ट ३३ ते ५८
सप्टेंबर ३५ ते ६०
ऑक्टोबर ३५ ते ६०
नोव्हेंबर ३५ ते ७२
ज्वारीचा उपलब्ध असलेला साठा कमी होत चालला आहे. यावर्षी दुष्काळामुळे उत्पादन कमीच होण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील वर्षभर ज्वारी भाव खाण्याची शक्यता आहे.
बाजार समिती बाजारभाव
अहमदनगर ३५ ते ५०
धुळे ३७ ते ४८
जळगाव ४७ ते ५०
सोलापूर ५० ते ६२
पुणे ६० ते ७२
छ. संभाजीनगर २५ ते ५५
गतवर्षी ज्वारीचे उत्पादन कमी झाले होते. सर्वत्र तुटवडा असल्यामुळे बाजारभाव वाढू लागले आहेत. दुष्काळामुळे यावर्षीही अपेक्षित उत्पादन होणार नसल्यामुळे वर्षभर ज्वारीला चांगला भाव मिळेल.
- नीलेश वीरा, संचालक, धान्य मार्केट, मुंबई बाजार समिती