डीजेच्या आवाजाने कानाच्या पडद्यांना होऊ शकते इजा
By Admin | Published: September 15, 2016 12:29 AM2016-09-15T00:29:51+5:302016-09-15T00:29:51+5:30
ढोल ताशांचा दणदणाट, टोलचा ठोका, ह्दयाचा ठोका चुकविणाऱ्या डिजेचा गगनभेदी आवाज याच्या संपर्कात बराच काळ राहिल्यास तुमच्या कानाच्या पडद्याचा छिद्र पडू शकते़ प्रसंगी अचानक ऐकू येणे बंद
विवेक भुसे,
पुणे : ढोल ताशांचा दणदणाट, टोलचा ठोका, ह्दयाचा ठोका चुकविणाऱ्या डिजेचा गगनभेदी आवाज याच्या संपर्कात बराच काळ राहिल्यास तुमच्या कानाच्या पडद्याचा छिद्र पडू शकते़ प्रसंगी अचानक ऐकू येणे बंद होण्याची शक्यता असल्याचा इशारा कान, नाक, घसा तज्ञांनी दिला आहे़
गणेश विसर्जन मिरवणुकीत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदुषण वाढले असून ढोल ताशांच्या दणदणाटाबाबत आता लोकांमधुनही आवाज येऊ लागला आहे़ दुसरीकडे स्पिकरच्या भिंती उभ्या केल्यामुळे विसर्जन मिरवणुकीत मंडळाबरोबर सहभागी होणाऱ्या लहान मुलांच्या कानावरही परिणाम होत असल्याने गेल्या काही वर्षापासून दिसू येऊ लागले आहे़ अनेकदा मुलांना स्पिकरच्या भिंतीपुढेच उभे केले जाते़
याबाबत कान, नाक घसा तज्ञ डॉक्टरांनी सावधानतेचा इशारा दिला आहे़ टेपण मेमोरियल हॉस्पिटलचे डॉ़ निवृत्ती शिंदे यांनी सांगितले की, स्पिकर, ढोलताशांच्या सानिध्यात बराच वेळ राहिल्यास लहान मुले, वयस्कर व्यक्ती यांच्या कानाच्या पडद्याला छिद्र पडू शकते़ गर्भवती महिलांच्या विशेषत: त्यांच्या गर्भातील बाळावर या मोठ्या आवाजाचा परिणाम होऊ शकतो़ बराच वेळ असा मोठा आवाज कानावर पडल्यास गर्भपाताची शक्यताही नाकारता येत नाही़
जास्त वेळ स्पिकरचा विशेषत: डि जेच्या आवाज कानावर पडत राहिल्यास कानाच्या नसा कमजोर होऊ शकतात़ अशा आवाजात लोक मोठ्याने बोलतात,त्याचा परिणाम होऊ रक्तदाब वाढू शकतो़ त्यातून मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता असते़
डॉ़ शिंदे म्हणाले, विसर्जन मिरवणुकीनंतरच्या दोन तीन दिवसात आमच्याकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये दरवर्षी मोठी वाढ होताना दिसून येते़ अजूनही आपल्याकडे कानाची काळजी घेण्याबाबत फारशी जागृती नाही़ त्यामुळे विसर्जन मिरवणुकीनंतर आपापल्या घरी गेल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांना ऐकण्याचा त्रास होऊ लागला की ते जवळच्या डॉक्टरकडे जातात़ अनेक जण घरच्या घरी उपचार करतात़ खूप त्रास होऊ लागल्यावरच ते कानाच्या तज्ञ डॉक्टरांकडे येतात़ तोपर्यंत ते दुखणे वाढलेले असते़
डि़ जे़ ढोलताशाच्या आवाजामुळे अनेकांच्या कानाच्या पडद्याला छिद्र पडणे, कानातून पू येणे, अचानक ऐकायला बंद होणे अशा तक्रारी सुरु होतात़
विघ्नहता न्यासचे विश्वस्त आणि कान नाक घसाचे डॉ़ मिलिंद भोई यांनी सांगितले की, अनेकदा स्पिकरच्या भिंतीशेजारी लहान मुले बसलेली असतात़ त्यांना तेथे बसून देऊ नये़ या आवाजामुळे कान फुटणे, बधीरपणा येणे, काहींना तात्पुरता तर काहींना कायमस्वरुपी ऐकण्याचा त्रास होऊ शकतो़ त्यामुळे अगोदरच काळजी घेणे केव्हाही चांगले़
काय काळजी घ्यावी
* कानात कापूस घालावा़ पोहण्यासाठी वापरण्यात येणारे एअर प्लगचा वापर हा या आवाजावर सर्वात चांगला उपाय आहे़
* स्पिकरच्या आवाजाच्या रेषेत खूप वेळ थांबू नये़
* तान्ह्या मुलांना शक्यतो दूर ठेवावे़ या मुलांना अनेकदा पुढील ८ ते १० दिवसांनी त्रास सुरु होतो़ त्यांचे रडणे सुरु होते, पण काय त्रास होतो, हे त्यांच्या आईवडिलांना समजत नाही़
त्रास झाल्यास हे करा
* कानावर आवाजाचे मोठे आघात झाल्यास कानाचा पडदा फाटू शकतो़ कानातून हवा गेल्यासारखे वाटते़ अशावेळी अनेक जण कानात तेल टाकतात़ पण, कोणीही कोणतेही तेल कानात टाकू नये़ तेल टाकल्यास तेथे बुरशी होते व कानातून पाणी येते़
आंघोळीच्या वेळी कानात पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी़
रक्त पुरवठा करणाऱ्या नसा कमजोर झाल्याने अचानक ऐकू नये बंद होते़ हा दुखणे काही दिवसांनी आपोआप बरे होऊ शकते़ त्यासाठी कमजोर झालेल्या नसा सशक्त करण्यासाठी टॉनिक, इंजेक्शन दिले जातात़
..............
आपले कान ८० डेसिबल आवाज सहन करु शकतात
सामान्य माणसाचे कान हे ७५ ते ८० डेसिबलपर्यंतचा आवाज सहन करु शकतात़ गर्दीच्या ठिकाणी ११० डेसिबलपर्यंतचा आवाजा आपण सहन करु शकतो़ त्याच्यापुढे आवाजाची पातळी गेली की त्याचा आपल्या कानावर कळत न कळत परिणाम होत असतो़ अनेकदा त्याचा परिणाम आपल्याला स्पष्ट दिसून येतोच असे नाही़ माणसाच्या कानावर होणाऱ्या परिणामाचा विचार करुनच ध्वनीप्रदुषण कायदा रहिवासी भागात दिवसा ही मर्यादा ५५ आणि रात्री ४५ डेसिबल ठेवण्यात आली आहे़ विसर्जन मिरवणुकीत अनेक ठिकाणी ध्वनी प्रदुषणाची ही मर्यादा १५० डेसिबलच्या पुढे जाताना दिसते़