‘ध्वनिक्षेपकास शिवाजी पार्कात परवानगी नाही’
By admin | Published: January 26, 2017 05:27 AM2017-01-26T05:27:39+5:302017-01-26T05:27:39+5:30
मुंबईच्या मध्यावर असलेले व शिवसेना, मनसेचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या ‘शांतता क्षेत्रा’तील शिवाजी पार्कवर यापुढे ध्वनिक्षेपक लावण्यास परवानगी दिली जाणार नाही
मुंबई : मुंबईच्या मध्यावर असलेले व शिवसेना, मनसेचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या ‘शांतता क्षेत्रा’तील शिवाजी पार्कवर यापुढे ध्वनिक्षेपक लावण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे आश्वासन बुधवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिले. त्याशिवाय परवानगी न घेताच, ध्वनिक्षेपक वापरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशीही माहिती सरकारने उच्च न्यायालयाला दिली.
शिवाजी पार्क ‘शांतता क्षेत्रात’ मोडत असतानाही शिवाजी पार्क पोलिसांनी बालदिन, रथयात्रा या दिवशी या ठिकाणी ध्वनिक्षेपक लावण्यास परवानगी दिली. पोलिसांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने, विकॉम ट्रस्टने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला.
गेल्या सुनावणीत शिवाजी पार्क पोलिसांनी उच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागतली. मात्र, उच्च न्यायालयाने माफी देण्यापूर्वी यापुढे शिवाजी पार्कवर ध्वनिक्षेपक लावण्यास परवानगी देण्यात येणार नाही, असे आश्वासन राज्य सरकारला देण्याचा आदेश दिला. या आदेशाचे पालन करत, राज्य सरकारने यापुढे शिवाजी पार्कवर ध्वनिक्षेपक लावण्यास परवानगी देणार नाही, असे आश्वासन प्रतिज्ञापत्राद्वारे दिले. ‘परवानगी न घेताच ध्वनिक्षेपक वापरणाऱ्यांवर मुंबई पोलीस कायदा व संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल,’ असेही सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)