Rain Update: दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 01:13 AM2020-10-14T01:13:58+5:302020-10-14T06:52:38+5:30
पावसाचे ढग दाटून आले. ढगांनी काळोख केला होता. पावसाची चिन्हे निर्माण झाली होती. मात्र सायं पाच वाजेपर्यंत पावसाचा पत्ता नव्हता.
मुंबई : बंगालच्या उपसागराच्या पश्चिम मध्य भागात निर्माण झालेला अति कमी दाबाचा पट्टा ताशी १७ किलोमीटर वेगाने पुढे सरकत असून, त्याचा परिणाम म्हणून बुधवार आणि गुरुवारी दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडले, असा इशारा हवामान खात्याने दिला.
१४ ऑक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी, तसेच कोकण आणि गोवा, उत्तर कर्नाटकचा आतील भाग आणि मराठवाडा भागात मुसळधार किंवा अति मुसळधार, तर कर्नाटकचा किनारी प्रदेश, तसेच दक्षिण कर्नाटकचा आतला भाग येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत मंगळवारी दिवसा स्वच्छ सूर्यप्रकाश पडला होता, तर दुपारी रखरखीत ऊन होते. दुपारी तीन वाजल्यानंतर मात्र हवामानात अचानक बदल झाले. पावसाचे ढग दाटून आले. ढगांनी काळोख केला होता. पावसाची चिन्हे निर्माण झाली होती. मात्र सायं पाच वाजेपर्यंत पावसाचा पत्ता नव्हता.
परतीच्या पावसाचे भाकीत बदलले
सक्रीय हवामानाच्या परिस्थितीमुळे मान्सूनच्या परतीचा प्रवास ६ ऑक्टोबरपासून पुढे सरकला नाही. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात अजून पुढील तीन दिवस पावसाचा मुक्काम राहील. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, १७ सप्टेंबरच्या आसपास मान्सून राजस्थानतून आपला परतीचा प्रवास सुरू करतो. मात्र यावर्षी तब्बल ११ दिवस विलंबाने म्हणजे २८ सप्टेंबर रोजी मान्सूनने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. हवामान खात्याकडील माहितीनुसार, मान्सून ६ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातून परतीचा प्रवास सुरू करणार होता. मात्र सक्रीय हवामानाच्या परिस्थितीमुळे मान्सूनच्या परतीचा प्रवास ६ ऑक्टोबरपासून पुढे सरकला नाही. आजघडीला पर२तीचा मान्सून उत्तर अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात आहे.
मुंबई, ठाण्यातही वाढणार पावसाचा जोर
राज्यात मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी मुंबई, ठाण्यासह कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. - कृष्णानंद होसाळीकर, उपमहासंचालक, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग
अशा होत्या मान्सूनच्या परतीच्या तारखा (ऑक्टोबर)
जळगाव ६
नागपूर ६
मुंबई ८
अहमदनगर ८
सातारा ९
कोल्हापूर ११
पुणे ११